बालेवाडी : शेतकरी आठवडी बाजाराची बदलती संकल्पना बाणेर-बालेवाडी परिसरात उत्तम प्रकारे रुजू लागली असून, त्यानिमित्ताने शहरातल्या नागरिकांची, शेतकऱ्यांची आणि निसर्गाशी परत नाळ जुळू लागली आहे. हा आठवडी बाजार सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. शहरी ग्राहक आणि शेतकरी या दोघांच्या फायद्यासाठी बालेवाडी येथे भरवल्या जात असलेल्या आठवडी बाजारांचा प्रतिसाद प्रचंड वाढत आहे. भाजीपाला आणि फळे पिकवणारा शेतकरी त्याचा माल जेव्हा घाऊक बाजारात घेऊन येतो, तेव्हा त्याच्या मालाला चांगला दर मिळत नाही आणि हाच भाजीपाला खरेदी करण्यासाठी शहरातील सर्वसामान्य ग्राहक जेव्हा बाजारात जातो, तेव्हा त्याला कोणतीच गोष्ट कमी दरात मिळत नाही. ही परिस्थिती ओळखून शेतकरी व आपल्या भागातील ग्राहक या दोघांचाही फायदा व्हावा, असे काही तरी करण्याच्या विचाराने बाणेर-बालेवाडी येथील लहू बालवडकर यांनी आपल्या भागात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या सहकार्याने आठवडी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज शेतकरी अतिशय ताजा म्हणजे सकाळी शेतातून तोडलेला गुणवत्तापूर्ण व निवडक भाजीपाला दुपारी या बाजारांमध्ये घेऊन येतात. प्रत्येक आठवडी बाजारात सुमारे १३ ते १५ हजार नागरिक सहभागी होत असून सुमारे ६० शेतकरी गट, १० शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी यांच्यामार्फत भाजीपाल्याची थेट विक्री होते. ग्राहकांना उत्तम प्रतीचा भाजीपाला कमी दरात उपलब्ध होतो.>भाजीपाला व फळे नियमनमुक्त करून शेतकऱ्यांना आपल्या मालाची थेट विक्री करण्याची मुभा देण्याच्या राज्य सरकारच्या विरोधात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील किरकोळ व्यापाऱ्यांचा संप अद्याप न मिटल्याने ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी व शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टिकोनातून आता बाणेर-बालेवाडी येथे रोज आठवडी बाजार भरविणार. - लहू बालवाडकर, संयोजक
आठवडी बाजार ठरतेय वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 00:51 IST