अकोला: पश्चिम वर्हाडात झालेल्या अतवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आले असून मंगळवारी काही मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. तीनही जिल्ह्यात अनेक घरांची पडझड झाली. वाशिम जिल्ह्यातील अकरापैकी तीन प्रकल्प तुंडुंब भरले असून बुलडाणा व अकोल्यातील प्रकल्पांना मात्र आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, पुरामुळे शेगाव येथील एक महिला व अकोल्यातील एक इसम वाहून गेल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. पाच दिवसांपासून अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे १२ जुलै रोजी नाले,नद्यांना मोठे पूर आले आहेत. अकोला-आकोट रस्त्यावरील गांधीग्राम जवळील पुर्णा नदीवरील ब्रिटीशकालीन पुल पाण्याखाली आला. जवळपास १४ फूटावरुन पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प असून आकोट व तेल्हारा तालुक्याचा अकोला शहराशी संपर्क तुटला आहे. बाळापूर तालुक्यात मोर्णा नदीच्या अंदुरा येथील पुलावरून ४ फूटएवढे पाणी वाहत असल्याने आकोट-शेगाव रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. एकलारा गावाचा रस्ताच वाहून गेल्याने या गावाचा इतर सर्व गावांशी संपर्क तुटला आहे. दरम्यान, अकोला तालुक्यातील बोरगावमंजूनजीकच्या मुजरा मोहम्मदपूर येथील एक ६0 वर्षीय इसम रामगावजवळील कोली नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना मंगळवारी घडली. या इसमाचे नाव मात्र कळू शकले नाही.बुलडाणा जिल्ह्मत चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून सोमवारी झालेल्या पावसामुळे जिल्हय़ातील सात तालुक्यात अतवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील पूर्णा, बोर्डी या प्रमुख नद्यांसह नाल्यांना पूर आले आहेत. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने खरिपातील पिकांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, शेगाव तालुक्यातील वरखेड येथील मैनाबाई शिरसाट (७८ वर्ष) ही महिला सोमवारी संध्याकाळी नैसर्गिक विधीसाठी गेली असता बोर्डी नदीच्या पुरात वाहून गेली. मंगळवारी सायंकाळी या महिलेचा मृतदेह सापडला.वाशिम जिल्ह्यात झालेल्या पावसाने पैनगंगा नदीवरील उभारण्यात आलेल्या अकरापैकी तीन बॅरेजेस तुडुंब भरले आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील पोटे येथे चार घरांची पडझड झाली असून अनेक गावांमध्ये पडझडीच्या घटना घडल्या आहेत.
पश्चिम व-हाडात पावसाचा कहर !
By admin | Updated: July 13, 2016 01:23 IST