(स्थळ : ‘मातोश्री’ महाल. पिपात डोकावून महाराजांच्या कसला तरी चाळा चाललेला.)
मिलिंद : महाराज, हे दिवस उभं ठाकण्याचे. तुम्ही खाली वाकून काय करताहात ?
उद्धोराजे : (डोकं बाहेर काढून) पिपात कुठली लाट दिसतेय का ते पाहतोय!
मिलिंद : (गोंधळून) बाहेर ढीगभर माणसं उभी राहिलीत. तुमच्याकडून राखी.. माफ करा; शिवबंधन बांधून घ्यायला. त्यांच्याकडे जरा लक्ष द्यायला हवं.
उद्धोराजे : थांब. गडबड करू नकोस. नीलमताईंना मी तीनशे शिवबंधनांची ऑर्डर दिलीय. प्रत्येक मतदारसंघात ‘भगवं मनगट’ दिसलं पाहिजे.
मिलिंद : (मिस्किलपणे) मग मतदारांनी तिकडचा ‘भगवा पंचा’ काय ‘हात’ पुसायला वापरावा काय?
उद्धोराजे : (अस्वस्थ होत) खामोश. त्याला ‘पंचा’ म्हणू नकोस. ते तर ‘गळ्यातलं लोढणं’ ठरलंय आपल्या. विनाकरण फरफटत चाललोय मी त्यांच्यासोबत.
मिलिंद : (हळूच) म्हणूनच त्या दिवशी सांगत होतो की, ‘अमितभाईंच्या चहात थोडं मीठ टाका’ म्हणून!
उद्धोराजे : (सिंधुदुर्ग अन् नाशिकच्या दिशेनं नजर टाकत) पण आपलं ‘मीठच आळणी’ असं मला कुणीतरी सांगितलं होतं रे ऽऽ पूर्वी.
मिलिंद : (‘कृष्णकुंज’कडं पहात) म्हणूनच ‘आत’ येण्यासाठी ‘मातोश्री’बाहेर थांबलेल्या इच्छुकांपेक्षाही आजपर्यंत आपल्याला ‘सोडून’ गेलेल्यांची संख्या मोठी असावी महाराज.
उद्धोराजे : (सात्विक संतापानं) तरीही आपलीच लाट मोठ्ठी. अगऽऽदी त्या नरेंद्रभाईंच्या लाटेपेक्षाही.
मिलिंद : (हळूच कानात) तुम्हाला एक चांगला सल्ला देतो महाराज. तुम्ही ‘कमळाक्का’ला काय बोलायचं ते बोला; पण नरेंद्रभाईंचं नाव घेताना दहादा विचार करा. रयतेला म्हणे रुचत नाही ते.
उद्धोराजे : (आश्चर्यानं) पण का ?
मिलिंद : तुम्ही सोशल मीडियावरही पाहा. एखाद्यानं चुकून जरी भार्ईंबद्दल अवाक्षर शब्द टाकला तर, बाकीचे अक्षरश: तुटून पडतात. ‘भाईचं गुणगान’ गाण्यासाठी लगेच ‘पोस्टवर पोस्ट’ पडतात.
उद्धोराजे : (स्वत:च्याच तंद्रीत) म्हणून काय झालं? या पिपात बघ. मी साधं हातानं ढवळलं तरीही मोऽऽठ्ठीच्या मोठ्ठी लाट तयार होतेय. आहे ना गंमत?
मिलिंद : (गंभीरतेनं) महाराज. बंद घरात अशी स्वत:ची लाट अनुभवता येत नसते. त्यासाठी घर-दार सोडून बाहेर पडावं लागतं. किनार्याला धडकून वादळ-वारं अंगावर घ्यावं लागतं. आहे तयारी ?
- सचिन जवळकोटे