पनवेल : खारघर सेक्टर ३३ मधील नाल्यात मलनिस्सारणचे पाणी थेट उघड्यावर सोडले जात आहे. यामुळे जवळच असलेल्या पेठ गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, या पाण्यामुळे गावात दुर्गंधी पसरली आहे. सिडकोने यासंदर्भात योग्य त्या उपाययोजना न केल्यास ओवे ग्रामपंचायतीच्या सदस्या सुजाता जोशी यांनी सिडकोला आंदोलनाचा इशारा दिला आहे . खारघर सेक्टर ३३ मधील पेठपाडा गावाजवळील नाल्यामध्ये सेक्टर ३० , ३४, व ३५ मधील रहिवाशांकडून मलनिस्सारणाचे पाणी सोडले जात असल्याने स्थानिक गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा त्रास होत आहे. परिसरात मलेरिया तसेच इतर रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. गावाजवळून जाणाऱ्या या उघड्या नाल्यामध्ये हे दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात आहे. या नाल्यांना बंदिस्त करणे गरजेचे आहे. वेळोवेळी मागणी करून देखील सिडको त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. गावातील लहान मुलांना देखील यामुळे श्वसनाचे आजार होत आहेत. यामुळे लवकरात लवकर सिवरेज लाइनचे काम पूर्ण करावे अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा सुजाता जोशी यांनी निवेदनाद्वारे सिडकोला दिला आहे. (प्रतिनिधी)
पेठ गावात उघड्यावर मलनिस्सारणचे पाणी
By admin | Updated: April 28, 2016 03:16 IST