मिरज : वारणा धरणातून सोडलेले पाणी अद्याप मिरजेपर्यंत पोहोचले नसल्याने म्हैसाळ योजना व मिरजेतून लातूरला रेल्वेने होणारा पाणीपुरवठा दुसऱ्या दिवशीही बंद होता. वारणा धरणातील पाणी येण्याची प्रतीक्षा सुरू असून, सोमवारी नदीपात्रात पुरेसा पाणीसाठा झाल्यास म्हैसाळ योजनेचे पंप व जलदूत एक्स्प्रेस पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईची झळ आता मिरजेच्या रेल्वेस्थानकावरही जाणवत आहे. त्यामुळे या ठिकाणी रविवारी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. कृष्णा नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावल्याने गुरुवारपासून म्हैसाळ योजनेचे ६५ पंप बंद झाले आहेत. ‘म्हैसाळ’च्या पहिल्या टप्प्यातील पंपगृहाच्या १५ पंपांद्वारे पाणी उपसा करण्यात येत असल्याने म्हैसाळ बंधाऱ्यात आठ फूट पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. मिरजेत कृष्णा घाटावर रेल्वेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलजवळ नदीपात्र कोरडे असल्याने, रेल्वेसाठी होणारा पाणी उपसा शुक्रवारपासून बंद झाला आहे. पाणी उपसा थांबल्याने गेले ४० दिवस दररोज लातूरला पाणी घेऊन जाणारी जलदूत एक्स्प्रेस थांबली आहे. सोमवारी नदीपात्रात पाणी आल्यास मंगळवारी जलदूत एक्स्प्रेस लातूरला जाण्याची शक्यता आहे.
मिरज रेल्वे स्थानकाला टॅँकरने पाणी
By admin | Updated: May 23, 2016 04:37 IST