कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : पावसाळ्यात कोकण रेल्वेमार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने सज्जता केली आहे. या मार्गावर सतर्कता राखण्यासाठी ५५० कर्मचारी २४ तास पहारा देणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे विभागीय क्षेत्रीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी रविवारी दिली.बाळासाहेब निकम यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ते म्हणाले, कोकण रेल्वे मार्गावरील उंच व धोकादायक दरडी कमी केल्या आहेत. मात्र, बोर्डवे ते चिपळूण आगवे येथील मोठ्या दरडी जैसे थे आहेत. बोगद्यांमध्ये सौम्य परंतु आकर्षक असे एलईडी लाईट लवकरच बसविण्यात येणार आहेत, असे सांगून ते म्हणाले, नैसर्गिक आपत्ती ओढवू नये, यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. सतर्कता म्हणून २४ तास पहारा या मार्गावर असेल आणि यासाठी ५५० कर्मचारी दिवसरात्र सेवा देणार आहेत. यावर्षी देखील पावसाळ्यात कोकण रेल्वेवर धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलले असून त्याची अंमलबजावणी बुधवारपासून होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. (प्रतिनिधी) ----------गेल्यावर्षी गणेशोत्सवादरम्यान काही ठिकाणी नैसर्गिक आपत्तींमुळे घडलेल्या घटनांमुळे येथील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागले होते. आता येत्या गणेशोत्सवात चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही निकम यांनी दिली.
कोकण रेल्वे मार्गावर २४ तास पहारा
By admin | Updated: June 8, 2015 01:28 IST