अलिबाग : महाड तालुक्यातील खर्डी गावात ‘एकात्मिक पाणलोट विकास’ योजनेंतर्गत केलेल्या बेकायदा कामांमुळे १२ एकर जमीनीचे नुकसान झाल्याचे आणि त्यात २२ लाख ८२ हजार ७८३ रुपयांच्या भ्रष्टाचारा झाल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर रायगडचा कृषि विभाग खडबडून जागा झाला आहे. महाडच्या राजकीय क्षेत्रातही अस्वस्थता निर्माण झाली आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याचे रायगड जिल्हा कृषी अधिक्षक के. बी. तरकसे यांनी सांगितले. पुणे येथील ‘वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणे’कडून ही योजना राबवली गेली आहे.हे काम करताना शेतकरी महाडीक यांची परवानगी का घेण्यात आली नाही, योजनेत नेमके किती काम झाले आणि निधीचे वितरण योग्य प्रकारे झाले की नाही याची चौकशी करण्यात येणार आहे. ही योजना खर्डी, चापगाव, वरंडोली, वाळसुरे, कोतूर्डे, नेराव, कोंझर, पूनाडे व घेराकिल्ला या नऊ गावांसाठी आहे. तीन कोटी रुपयांची ही योजना २०१०-११ मध्ये सुरू झाली आहे. ग्रामसमिती व वनराई संस्थेच्या माध्यमातून ती सुरू आहे. जलपातळी, पीक वृद्धीचा अहवाल नाहीरायगड जिल्ह्यात या २१ पाणलोट विकास योजनांच्या माध्यमातून झालेल्या कामांवर आता पर्यंत ६० कोटी पैकी ४५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यांतून गेल्या चार वर्षांत भातशेती क्षेत्रातआणि भात उत्पादनात किती वाढ झाली, भूगर्भातील जलपातळीत वाढ होवून किती गावांतील पाणी टंचाई दूर झाली, या बाबतचा कोणताही अहवाल जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी कार्यालया कडे नाही. निधीच्या वापरा बाबतचे लेखा परीक्षण अहवाल देखील उपलब्ध नाहीत. (प्रतिनिधी)
पाणलोट भ्रष्टाचारात कृषी खात्याला जाग
By admin | Updated: February 13, 2015 01:29 IST