उपनगरांना झोडपले : दिवसभर रिपरिप सुरू
मुंबई : मुंबई शहरवगळता पूर्व आणि पश्चिम उपनगरांत सकाळी पडलेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पूर्व आणि पश्चिम उपनगरांत सकाळपासून सातत्याने संततधार सुरू होती. पावसाचा रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नसला तरीदेखील दिवसभर रिपरिप सुरू राहिल्याने मुंबईकर काहीसे कंटाळले होते.
शुक्रवारी रात्री लागून राहिलेल्या पावसाने शहर आणि उपनगरांना झोडपून काढले. शुक्रवारी मध्यरात्री पावसाने काही काळ विश्रंती घेतली. परंतु शनिवारी सकाळपासूनच पावसाने पुन्हा रिपरिप सुरू केली. मुंबई शहरात सकाळी तुरळक ठिकाणीच पावसाच्या सरी कोसळल्या. परंतु उपनगरांत मात्र थांबून थांबून पावसाचा मारा सुरूच होता. उपनगरात कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, भांडुप, विक्रोळी, मुलुंड, वांद्रे, अंधेरी, बोरीवली आणि गोरेगाव येथे पावसाने थैमान घातले. सकाळी सुरू झालेल्या पावसाने दुपारी थोडीशी विश्रंती घेतली. आणि सायंकाळी पाचनंतर पुन्हा त्याचा वेग वाढला. या वेळी मात्र मुंबई शहरासह उपनगरांत त्याने धुमाकूळ घातला. भायखळा, लालबाग, दादर, माहीमसह कुर्ला आणि अंधेरीकडील परिसराला सायंकाळच्या पावसाने धुवून काढले. दरम्यान, सकाळपासून रिपरिप सुरू असली तरी त्याचा रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला नाही. उलटपक्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि लालबहादूर शास्त्री मार्गावरील वाहतूक सुरळीत आणि वेगाने सुरू होती. शिवाय काही ठिकाणची वाहतूककोंडी वगळता वाहनचालकांना वाहतूककोंडीचा फटका बसला नाही. शिवाय
हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूकही नियमित सुरू होती. (प्रतिनिधी)
स्लॅब, भिंत पडली
महापालिका नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी-कुर्ला रोड येथील पद्मानगरमधील घरचा काही भाग कोसळला. भेंडीबाजार येथील एका चार माळ्याच्या इमारतीचा काही भाग पडला. मस्जीद बंदर येथील पी. डिमेलो रोड येथे भिंत पडल्याची घटना घडली. परेरावाडी येथील काही झोपडय़ांचे भाग पडले. भुलेश्वर येथील भगत इमारतीच्या सीलिंगचा भाग पडला असून, ही इमारत रिकामी करण्यात आली आहे. मरोळ येथील भिंतीचा काही भाग पडल्याची घटना घडली.