मुंबई : राज्य सरकारने वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणातील मराठा आरक्षणानुसार झालेले प्रवेश कायम करण्यासाठी अध्यादेश काढला असून, तो राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आला आहे. या अध्यादेशावर स्वाक्षरी झाल्यानंतरच सरकार त्याची अधिसूचना काढणार आहे, पण या अध्यादेशात नेमके काय आहे, याची माहिती अद्याप कोणालाच नसल्याने मराठा विद्यार्थी, खुल्या गटातील विद्यार्थी, पालक तसेच सीईटी सेल यांचे लक्ष लागून आहे.
एकीकडे हा अध्यादेश लागू झाल्यानंतर त्या संदर्भातील प्रवेश निश्चितीची सूचना सीईटी किंवा वैद्यकीय संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतरच मराठा आंदोलक विद्यार्थी आपले आंदोलन मागे घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्या आझाद मैदानात मराठा आंदोलक विद्यार्थी ठाण मांडून आहेत. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले असले, तरी आमचा लढा योग्य दिशेने सुरू आहे. सरकारने हा अध्यादेश काढण्यात योग्य ती दक्षता घेतली असल्यास, तो निश्चितच न्यायालयातही टिकेल, अशी आशा मराठा आंदोलक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.अध्यादेशात नेमके काय आहे, खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने नेमकी काय तजवीज केली आहे, या सगळ्यांची माहिती घेतल्यानंतरच आपण न्यायालयात जायचे की नाही, याचा निर्णय खुल्या गटातील विद्यार्थी पालक घेणार आहेत.