Thackeray Group MP Vinayak Raut News: राज्यात एकीकडे बीड आणि परभणी प्रकरणावरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. या प्रकरणी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट कंबर कसून तयारीला लागला असून, उद्धव ठाकरे जातीने सर्व गोष्टींचा आढावा, बैठका घेत आहेत. यातच आता ठाकरे गटातील खासदाराने लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर टीका केली आहे.
लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांचे महायुती सरकारवर टीकास्त्र सुरूच असल्याचे दिसत आहे. यातच डिसेंबर महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात वळते करण्यात आले आहेत. तसेच लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आले आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी लाडकी बहीण योजनेबाबत दावा करताना महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
महापालिका निवडणुका होताच लाडकी बहीण योजना बंद करतील
महाराष्ट्र कर्जामध्ये डुबलेला आहे, त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळण्याचे आव्हान अजित पवार कसे पेलणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकींपर्यंत लाडकी बहीण योजनेचा प्रयोग ते नक्की करतील. त्यानंतर ही योजना बंद पाडतील. या योजनेचा डोलारा सांभाळणे जिकरीचे काम आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका संपल्या की ही योजना बंद करण्यात येणार, असा मोठा दावा विनायक राऊत यांनी केला.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त
संतोष देशमुख यांच्या हत्येमागे कोण आहे, हे दिसून आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची गांभीर्याने दखल घेतील याची मला खात्री आहे. पण मागच्या दोन महिन्यात ज्या पद्धतीने हत्या होताहेत, लैंगिक अत्याचार, खून होताहेत, दरोडे पडताहेत, त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही, गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत, अशी टीका विनायक राऊतांनी केली.
दरम्यान, मुंबई महापालिकेवर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा डोळा आहे. त्यांना महापालिका हडप करायची आहे. मात्र मुंबईकर जनता जागृत आहे. कोणत्याही परिस्थितीत या लुटारूंच्या हातात मुंबईकर जनता महापालिका देणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट महापालिकेत निवडून येईल, असा दावा विनायक राऊतांनी केला.