उरण : देशात विविध बारा ज्योर्तिलिंगे प्रसिध्द आहेत. घारापुरी बेटावरही पुरातनकालीन चैतन्यमय आणि सजीव भासणारी बारा शिवलिंगे अस्तित्वात आहेत. श्रावणात या शिवलिंगांचे दर्शन म्हणजे शिवभक्तांना एक प्रकारची पर्वणीच ठरणार आहे. देशभरात सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, अमलेश्वर, वैजनाथ, रामेश्वर, काशिविश्वेश्वर, त्र्यंबकेश्वर, केदारेश्वर, घृणेश्वर आदी बारा ज्योर्तिलिंगे ठिकठिकाणी अवतीर्ण झाली आहेत. शाश्वत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अद्भुत ज्योर्तिलिंगांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातूनच नव्हे तर अगदी जगभरातूनही दरवर्षी कोट्यवधी शिवभक्त येतात. बम बम भोलेचा जयघोष करीत शिवाच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होतात. मुंबईपासून ११ किमी अंतरावर असलेले घारापुरी बेट सहाव्या शतकातील प्राचीन शिवकालीन लेण्यांमुळे कायम जागतिक प्रसिध्दीच्या झोतात राहिले आहे. काळ्या पाषाणात मोठ्या खुबीने कोरलेल्या शिल्पांमध्ये अर्धनारीश्वर शिव, कल्याणमूर्ती, अंधकासुरवध, गंगावतारण शिव, योगीश्वर उमा महेश्वरमूर्ती आणि २० फूट उंच आणि रुंदीची महेशमूर्ती आदी शिल्पांचा समावेश आहे. (वार्ताहर)
घारापुरी बेटावर बारा शिवलिंगांचे दर्शन
By admin | Updated: August 22, 2016 03:22 IST