ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. १३ - खंडाळा घाटातील शुटिंग पाँईट येथे मंगळवारी सायंकाळी दरीत पडलेला युवक हा सेल्फी काढताना पाय घसरुन पडला असल्याचे त्याचा मित्र पंचम रविदास याने सांगितले.
संतोष गोताड (३६) असे दरीत पडलेल्या युवकाचे नाव असून, तो मुंबईत सांताक्रुझ गोळीबार मैदान येथे रहात होता. लोणावळा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष व पंचम हे दोघेही लोणावळ्यातील ट्रायोज माँलमध्ये कामाला आहेत. काल मंगळवारी सुट्टी असल्याने ते दोघेही शुटिंग पाँईट येथे फिरायला आले होते.
सायंकाळी ६ च्या दरम्यान ते शुटिंग पाँईट येथिल दरीच्या तोंडावर एका झाडावर उभे राहून फोटे काढत होते. फोटो काढत असताना संतोष याचा पाय घसरल्याने तो दरीत पडला. पंचम व शुटिंग पाँईट येथिल खाजगी सुरक्षारक्षकांनी त्याला बाहेर काढण्याचा काही काळ प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाल्याने रात्री दहा वाजता लोणावळा पोलीसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
रात्री लोणावळा शहर पोलीस व लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र या रेस्क्यु टिमने घटनास्थळी भेट दिली, मात्र अंधार व पावसामुळे शोध मोहिम राबवता आली नाही. आज सकाळी शिवदुर्गचे पथक रोपच्या सहाय्याने दरीत उतरले असून शोध मोहिम सुरुच आहे.