नंदकिशोर नारे/ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 17 - एकीकडे धर्मांमध्ये तेढ निर्माण करुन जातीय दंगली घडविण्याचे प्रकार सुरु असतांना वाशिम जिल्ह्यातील जैनाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिरपूर जैन येथे असलेल्या जानगीर महाराज संस्थान व हजरत मिर्झा यांच्या दर्ग्यावर ४०० वर्षांपासून आजही वार्षिक कार्यक्रमामध्ये एकमेकांच्या संस्थानवर नैवेद्य पाठविल्याशिवाय कार्यक्रमास सुरुवात होत नाही. जिल्हयातील हिंदु-मुस्लिम ऐक्याचे हे प्रतिक असलेल्या या स्थळावर विदर्भासह मराठवाडयातील भाविकांची मोठया प्रमाणात उपस्थिती लाभते.वाशिम जिल्ह्यातील जैन समाजाची काशी संबोधल्या जाणाऱ्या शिरपूर जैन येथे संत जानगीर महाराज संस्थान व मुस्लिम संत हजरत मिर्झा यांचे समाधीस्थळ आहे. ४०० वर्षापूर्वी जानगीर महाराज व हजरत मिर्झा यांची मैत्री होती. जानगीर महाराजांचे संस्थान गावाच्या पूर्वेला तर हजरत मिर्झा यांचे दक्षिण दिशेला राहायचे. त्याकाळी ते एकमेकांना भेटायचे. देहवासन झाल्यानंतर दर महाशिवरात्रीला जानगीर महाराजांचा भव्य यात्रोत्सव येथे भरविल्या जातो. या उत्सवात महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते. महाप्रसाद तयार झाल्यानंतर प्रथम याचा नैवेद्य मिर्झा साहेबांच्या दर्ग्यावर पाठविला जातो. त्यानंतरचं महाप्रसाद कार्यक्रमास सुरुवात केल्या जाते ही परंपरा आजही कायम आहे.श्रावण महिन्यातही भाविकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. तसेच नोव्हेंबर महिन्यात हजरत बाबा मिर्झा यांचा उर्स असतो तेव्हा मोठी संदल मिरवणूक काढण्यात येते. ही मिरवणूक सुरु करण्याआधी जानगीर महाराज संस्थानवर कपडयांचा आहेर व प्रसाद नेल्या जातो त्यानंतरचं मिरवणूक व उर्वरित कामास आजही सुरुवात केल्या जाते. विशेष म्हणजे ही परंपरा अविरत सुरू राहावी यासाठी दोन्ही धर्मातील लोकांचे प्रयत्न दिसून येतात.
VIDEO- वाशीममध्ये घडलं हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
By admin | Updated: August 17, 2016 15:47 IST