ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 14 - मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या कपिलधार येथील धबधबा गेली काही दिवसांपासून वेगाने कोसळू लागला आहे. चार वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने नेहमीच धो-धो कोसळणारा धबधबा स्तब्ध झाला होता. येथे येणा-या पर्यटकांचीही निराशा होत होती.
बीड पासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या कपिलधार येथे डोंगराच्या कुशीत मन्मथस्वामींचे समाधी स्थळ आहे. राज्यभरातून भाविक येथे येत असतात. श्रावण महिन्यात तर दररोज भाविकांसह अनेक शाळा-महाविद्यालयाच्या सहलीही खास धबधबा पाहण्यासाठी येत असतात. यावर्षी पावसाने ओढ दिल्याने श्रावणात केवळ झिरपणारा धबधबा पाहूनच पर्यटकांना समाधान मानावे लागले होते. या आठवड्यात परतीचा पाऊस चांगला झाल्याने धबधब्याची धार वाढली आणि वेगाने कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पुन्हा लोकांची गर्दी वाढू लागली.