ऑनलाइन लोकमतपुणे, दि. ३१ : रुग्णाला योग्य ते उपचार दिले जात नाहीत आणि दुर्लक्ष केले जात असल्याच्या कारणावरुन रुग्णाच्या नातेवार्ईकांकडून दोन निवासी डॉक्टरांना ससून शासकीय रुग्णालयात जबर मारहाण करण्यात आली आहे. मागील वर्षभरात राज्यात घडलेली ही १२ वी घटना असून डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र सेवा अधिनियमानूसार ३५३, ३२४, ३०७, ३२३, ५०६ व १४३ या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. रमेश भिसे, राहुल परदेशी, अविनाश जाधव, रोहन साळवे व विकी गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत.
तानाजी कोंडीबा सकट (वय ४३) यांना शुक्रवारी छातीत दुखत असल्याने ससूनमधील वॉर्ड क्रमांक १४ मध्ये डॉ. वसुधा सरदेसाई यांच्या विभागात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णाची तब्येत खालाव चालल्याची कल्पना डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना वेळोवेळी दिली होती. मात्र शनिवारी रात्रीच्या वेळी डॉक्टरांचे म्हणणे ऐकून न घेता रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉ. अभिजित जवंजाळ व डॉ. सादिक मुल्ला या कामावर असणाऱ्या निवासी डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
दोन्ही निवासी डॉक्टरांवर आता रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार चालू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले. रुग्णाला यकृताचा दिर्घकालीन आजार असल्याने रुग्णाची स्थिती खालावत चालली होती. संबंधित रुग्णाचा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय होता तर रुग्णाला दारु आणि तंबाखूचेही व्यसन होते. रुग्ण रुग्णालयात दाखल झाला तेव्हाच त्याला रक्ताच्या उलट्या होत होत्या. हीमॅटेमॅसिस आजाराच्या या रुग्णाच्या पोटातही दुखत होते असे मार्डचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर हळणोर यांनी सांगितले.