‘ब्रीज अलर्ट’ देणार धोक्याचा इशारा
ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. २० - सावित्री नदीवरील पूल कोसळल्याने अनेकांना प्राण गमवावा लागला. त्यानंतर महामार्गावरील जुन्या पुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशाप्रकारे एखादा धोकादायक पूल कोसळून पुन्हा अशी दुर्घटना घडू नये म्हणून रत्नागिरीतील गौतम बाष्टे या तरुणाने नवीन ‘ब्रीज अलर्ट’ यंत्रणा हे तंत्र शोधून काढले आहे. या यंत्रणेचा धोकादायक पुलावर वापर केला तर दुर्घटना घडल्यानंतर तत्काळ दोन्ही बाजूची फाटके खाली येतील व यातील रेड सिग्नल वाहनचालकांना धोक्याचा इशारा देईल. या यंत्रणेत काही सुधारणा करून महामार्गावर ती वापरणे शक्य होईल, असा विश्वास बाष्टे यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई - गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल काही दिवसांपूर्वीच रात्रीच्यावेळी पुरात वाहून गेला. त्यामुळे अर्धवट स्थितीत असलेल्या पुलावरुन दोन एस्. टी. बसेस व अन्य गाड्या नदीत बुडाल्याने ४०पेक्षा अधिक प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे हाहाकार उडाला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून स्ट्रक्चरल आॅडिटचा आदेश देण्यात आला. आॅडिट झाले तरी तत्काळ या पुलांची दुरुस्ती करणे किंवा नव्याने उभारणी करणे शक्य होणार नाही. त्यामुळेच या पुलाचा एखादा दगड कोसळला तरी त्याचा अलर्ट देणारी यंत्रणा गौतम बाष्टे यांनी बनवली आहे.
मुंबई - गोवा महामार्गावर अनेक जुने पूल धोकादायक स्थितीत आहेत. बावनदीवरील पूल सर्वाधिक जुना व अधिक धोकादायक बनला आहे. बाष्टे यांनी बनवलेल्या यंत्रणेच्या प्रतिकृतीनुसार त्यात काही तांत्रिक बदल करून अशा पुलांवर ही यंत्रणा बसवल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकेल.
पुलाला कोणताही धोका निर्माण झाला तर त्याबाबत या यंत्रणेमुळे महामार्गावरून वाहतूक करणाºया वाहनांना तत्काळ अलर्ट मिळू शकेल. ही यंत्रणा राज्यभरातील जुन्या पुलांवर बसवल्यास त्यामुळे पुलांपासून असलेल्या संभाव्य धोक्यापासून वाचण्यासाठी उपयोग होईल, असा विश्वास बाष्टे यांनी व्यक्त केला आहे.