ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १० - संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून, रामकुंड परिसरात पूर सदृश स्थिती निर्माण झाली आहे. गोदावरीला आलेल्या पुरामध्ये एक चारचाकी, दोन दुचाकी व चार टपऱ्या वाहून गेल्या. तसेच रामकुंड पार्किंग व यशवत महाराज पटांगणावर भाविकांच्या दोन चारचाकी अडकल्या.
रामकुंडावर अडकलेल्या दोन भाविकांची अग्निशमन विभागाने सुटका केली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील रामकुंडावरील गांधी ज्योत इथं पाणी शिरल्याने दोन व्यक्ती अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांची नुकतीच सुखरूप सुटका केली आहे.
पेठमध्ये पावसाचा धुमाकूळ
मागच्या ४८ तासापासून पेठ तालुक्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून नद्या नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शनिवारपासून सुरू झालेला मुसलधार पावसाने रविवारी आधिकच जोर धरल्याने सर्व तालुका जलमय झाला आहे. लहान मोठया गावांना जोडणाऱ्या फरशी पूलावरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर पूरातून मार्गक्रमण करतांना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.
भात नागलीच्या रोपांचे नुकसान
अचानक सुरु झालेल्या पावसाने आधीच पेरणी केलेल्या भात व नागलीच्या रोपांची धूप झाली असून रोपे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
दरडी कोसळून दगड रस्त्यावर
पेठ तालुक्यातील कोटंबी, सावळघाट, आंबे, भूवन, शेपूझरी आदी घाटात दरडी कोसळून दगड रस्त्यावर आले असून घाटातून प्रवास करतांना वाहनधारकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.