ऑनलाइन लोकमतशेगाव, दि. 17 - भीक मागण्याच्या जागेवरून मंगळवारी झालेल्या वादाचे पर्यावसन खुनात झाले. याप्रकरणी सीसीटीव्ही क ॅमेरा फुटेजचा आधार घेत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. भीक मागून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालविणाऱ्या एका ६0 वर्षीय भिकाऱ्याचा जुन्या वादातून दोघांनी खून केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी मंदिर रोडवर घडली होती. गांधी चौक परिसरातील एका दारू दुकानातून जगदिशसिंग हा इसम दारू पिऊन परत येत असताना मंदिर रोडवरील फुटपाथवर दोन युवकांनी जगदिशसिंग खेमसिंग शिलखत्री रा. रामदेवबाबा नगर शेगाव या ६० वर्षीय वृद्धास मारहाण केली. या घटनेत भिकारी जगदिशसिंग याला लोटून दिल्यानंतर त्याचे डोके फुटपाथवरील पेव्हर ब्लॉकवर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर दोन्ही आरोपी युवक घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यशवंत बाविस्कर यांना मिळताच, त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळ गाठले. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. तपासाची सूत्रे फिरवित लगतच्या भवानी कार पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या सीसी कॅमेऱ्याच्या फुटेजेसची पडताळणी केली असता सदर भिकाऱ्याला दोन जण मारहाण करीत असल्याचे दिसून आले.पोलिसांनी दोन्ही युवकांची ओळख पटवून अर्ध्या तासाच्या आत अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये राजेश (वय २२) व रुपेश (वय २१) यांचा समावेश आहे. दरम्यान, मृतकाची पत्नी मंगला शिलखत्री यांनी पोलिसात तक्रार दिली की, पती जगदिशसिंग हे गजानन महाराज मंदिरासमोर भीक मागतात, आठ दिवसांपूर्वी राजेश व रुपेश नामक युवकांसोबत त्यांचा जागेवर उभे राहण्यावरून वाद झाला होता. यावेळी त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती व मंगळवारी पतीला त्यांनी ठार मारले, असे तक्रारीत नमूद केले आहे. आरोपी राजेश व रुपेश हे दोन्ही युवक मंदिरासमोर करदोळे व खेळणी विकत असल्याचे समजते. या प्रकरणी शेगाव पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३०२,५०४,५०६,३४ भादंविनुसार गुन्हा दखल केला आहे.
VIDEO- भीक मागण्याच्या वादातून भिकाऱ्याचा खून, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना अटक
By admin | Updated: August 17, 2016 17:25 IST