अकोला, दि. ३१- एमआयडीसी क्रमांक-४ मधील अक्षय केमिकल्स कारखान्याला भीषण आग लागून कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक झाला. ही घटना शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या बंबांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमानंतर सकाळी १0 वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली नव्हती.
एमआयडीसी क्रमांक-४ मधील परिसरात गोरक्षण रोडवर राहणारे उद्योजक शैलेश भगवानदास भुतडा यांचा अक्षय केमिकल्स नावाचा कारखाना आहे. कारखान्यामध्ये एरंडीपासून तेल काढल्यानंतर त्याचे औषध बनविण्यात येते. यासोबतच इतर रसायनेसुद्धा बनविण्यात येतात. शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास कारखान्यामध्ये अचानक आग लागली. पाहता-पाहता आगीने रुद्ररूप धारण केले. कारखान्यातील २0 ते २५ कर्मचार्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीचे रुद्ररूप पाहता, कारखान्यातील कर्मचार्यांचे प्रयत्न अपुरे पडले. महापालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती मिळताच, घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या बंबांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला; परंतु आग मोठय़ा प्रमाणात कारखान्यात पसरल्याने विझविण्यामध्ये अडचणी येत होत्या. संपूर्ण कारखाना आणि कारखान्यातील माल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने, कारखान्यात कोणालाच प्रवेश करता येत नव्हता. कारखान्याच्या बाहेरूनच पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सकाळी १0 वाजेपर्यंत सुरू होते. अखेर १0 वाजताच्या नंतर अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले; परंतु तोपर्यंत कारखान्यातील कोट्यवधी रुपयांचा माल व महागडी यंत्रे जळून खाक झाली होती.
एरंडी तेल उत्पादनांमुळे आगीचा भडका
अक्षय केमिकल्स कारखान्यामध्ये एरंडी तेलापासून उत्पादने तयार करण्यात येतात. आग लागल्यावर तेलाच्या उत्पादनांनी पेट घेतला. त्यामुळे आणखीनच आगीचा भडका उडाला. आग लागली तेव्हा सुदैवाने कारखान्यात कोणी कर्मचारी नव्हते. अन्यथा वित्तहानीसोबतच प्राणहानीसुद्धा झाली असती.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता
शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. कारखान्याचे संचालक शैलेश भुतडा यांनी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत तक्रार दिली नव्हती. त्यामुळे कारखान्यातील किती कोटीचा माल जळून नष्ट झाला, हे स्पष्ट होऊ शकले नाही.
दीड कोटी रुपयांचे नुकसान
आगीमध्ये कारखान्यातील यंत्र, एकूण उत्पादने मिळून अंदाजे दीड कोटी रुपयांच्यावर नुकसान झाल्याचा दावा कारखान्याचे संचालक शैलेश भुतडा यांनी केला आहे.
रात्रपाळीत तीन कामगार
संचालक शैलेश भुतडा यांच्या सांगण्यानुसार अक्षय केमिकल्स कारखान्यामध्ये एकूण नऊ कर्मचारी तीन पाळीत काम करतात. शुक्रवारी रात्रपाळीमध्ये तीन कर्मचारी काम करीत होते. कारखान्याला आग लागली, तेव्हा तीनही कर्मचारी आत होते.
https://www.dailymotion.com/video/x844mxl