पत्रपरिषद : विदर्भ राज्य आंदोलन समितीची माहितीअमरावती : १०८ वर्षे जुनी असलेल्या वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीकडे आतापर्यंत सर्वच राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे आता या मागणीसाठी २४ जुलै रोजी थेट दिल्लीतच जंतर मंतरवर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने धरणे देऊन ही मागणी पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याकडे रेटून धरणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रमुख वामनराव चटप, रामभाऊ नेवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. समितीच्या विभागीय कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते शहरात आले होते. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित मेळाव्यात पुढे बोलताना ते म्हणाले, विदर्भ राज्यसाठी अहिंसेच्या मार्गाने आतापर्यंत अनेक आंदोलने केलीत; मात्र दखल घेण्यात आली नाही. जुनीच मागणी असलेल्या विदर्भ राज्याकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष करुन तेलंगणा राज्य नव्याने निर्माण केले. विदर्भाच्या बाबतीत केंद्र व राज्य शासनाने नेहमीच अन्यायाची भूमिका घेतली आहे. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष कायम आहे. आतापर्यंत केवळ पश्चिम महाराष्ट्राचाच विकास करण्यात राज्यकर्त्यांनी धन्यता मानली. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार विधानसभा निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्य निर्माण करण्याबाबत घोषणा करावी, त्यानंतर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणीही पंतप्रधानांकडे केली जाणार असल्याचे चटप यांनी सांगितले. जंतर मंतरवर होणाऱ्या धरणे आंदोलनात विदर्भातील ११ जिल्ह्यांतून प्रत्येकी १०० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. विदर्भातील खासदारांनी आंदोलनाला भेट देऊन त्यांची भूमिका आंदोलनस्थळी स्पष्ट करण्याची आमची मागणी आहे. याचवेळी विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी तेलंगणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या राज्यातील खासदारांचाही पाठींबा मागण्यात आला आहे.या आंदोलनाला विदर्भातील विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. लोकशाहीत जनमताचा कौल महत्त्वाचा मानला जातो. यादृष्टीने विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जनमत चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये जनमताचा उत्स्फूर्त कौल मिळाला. उर्वरित सात जिल्ह्यातही लवकरच जनमत चाचण्या घेण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. ४ आणि ५ सप्टेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नागपुरात अधिवेशन आयोजित आहे. केंद्र शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार समितीने केला आहे. पत्रपरिषदेला वामनराव चटप, श्रीनिवास खांदेवाले, दीपक निलावार, प्रफुल्ल पाटील, जगदीश नाना बोंडे, अरुण केदार, प्रवीण महाजन, रामभाऊ नेवले, चंद्रशेखर देशमुख, नितीन मोहोड, दीपक सब्जीवाले, माया पाटील, पुसदेकर, रंजना मामर्डे, संजय कोल्हे, नंदा पराते यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
विदर्भ राज्याची मागणी दिल्लीत रेटणार
By admin | Updated: July 15, 2014 01:06 IST