धरणे भरली : गोसेखुर्दची सर्व, पुजारीटोला सात, लालनालाची पाच दारे उघडली, सतर्कतेचा इशारानागपूर : सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने विदर्भात उसंत घेतलेली नाही. गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोसेखुर्द धरणाचा जलसाठा वाढला असून मंगळवार दि. २२ जुलै रोजी धरणाचे सर्वच ३३ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले. तसेच गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोलाची सात व कालीसराडची चार आणि वर्धा जिल्ह्यातील लालनालाची पाच, नांद व पोथरा धरणाची दोन-दोन दारे उघडण्यात आली. भंडारा-गोंदियासह मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये अतिवृष्टी झाल्याने त्या भागातील वाहतूक खोळंबली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचा पूर ओसरला नसल्याने मंगळवारी १५० गावांचा संपर्क तुटला.नागपूर जिल्ह्यातदेखील दिवसभर आलेल्या संततधार पावसामुळे सामान्यांना अडचणींचा सामना करावा लागला. विशेषत: पहाटेच्या वेळी तर पावसाचा जोर वाढलेला दिसून आला. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार संपूर्ण जिल्ह्यात सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ५८.८ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली. ओडिशा किनारपट्टी व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा जोर अधिक होता. येत्या २४ तासात विदर्भात अतिवृष्टी होऊ शकते, असा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे.अतिवृष्टीमुळे भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या जलस्तरांत वाढ झाली आहे. बुडीत क्षेत्रातील गावांमध्ये धरणाचे पाणी शिरू नये, याकरिता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आलेले असून एक लाख पाच हजार घनमीटर पाण्याचा प्रति सेकंद वेगाने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पवनी तालुका, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. बुडीत क्षेत्रातील कोणत्याही गावांना धोका होऊ नये यासाठी २३८.८०० मीटरवर धरणाचा जलस्तर स्थिर ठेवण्यात येत ंआहे. गोंदिया जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. येथे सरासरी १३१.७८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून सर्व तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या रजेगाव येथील बाघ नदीवरील पुलाला सोमवारी सायंकाळी पाणी टेकल्याने वाहतूक बंद करण्यात आली. मंगळवारी सकाळी पुलावर २० सेंटीमीटर पाणी होते. ते सायंकाळी ४ वाजता पुलावरून ५० सेंमी वाहात होते. त्यामुळे गोंदिया-बालाघाट मार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाचे सात आणि कालीसराड धरणाचे चार दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी झाडे तुटून वीज वाहक तारांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. गोंदिया शहरात काही नागरी वस्त्या जलमय झाल्या आहेत.गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीला पूर आला असून तब्बल दीडशे गावांचा संपर्क तुटला आहे. या पुराचे पाणी भामरागडच्या वस्तीतही शिरले आहे. जिल्ह्यात ५९.७६ मिमी पाऊस पडला आहे. दुर्गम कोरची, अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा आदी भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अन्य तालुक्यात पावसाचा कहर सुरूच आहे. गेल्या २४ तासात सर्वाधिक १७७.६ मिमी पाऊस पडला आहे. या पावसामुळे वैनगंगा, कठाणी, पाल, खोब्रागडी व अन्य नद्याही दुथळी भरून वाहत आहे. अंतर्गत मार्गावरील लहान पुलावर पाणी आहे. यामुळे त्या परिसरातील वाहतूक प्रभावित झाली आहे. पर्लकोटा नदीला पुरामुळे आलापल्ली-भामरागड हा मुख्य मार्ग बंद झाला आहे. संततधार पावसामुळे तलावही तुडुंब भरले आहेत. भामरागड व अहेरी परिसरातील बसफेऱ्यांवरही परिणाम झाला आहे.वर्धा जिल्ह्यात सरासरी १३.५८ मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक २८.२ मि.मी. पाऊस समुद्रपूर तालुक्यात झाल्याने पोथरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. तसेच लाल नाला धरणाची पाच दारे २० से. मी. तथा नांद प्रकल्पाची दोन दारे २५ से. मी. उघण्यात आली आहेत. दरम्यान, लालनाला परिसरातील मार्डा ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सकाळपासून सुरू असलेल्या या पावसामुळे सुरू झालेल्या पेरणीला ब्रेक बसला आहे. यवतमाळ जिल्ह्यात १०.१९ मिमी पावसाची नोंद झाली. रिमझीम पडत असलेल्या पावसाने जिल्ह्यात कुठेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. आतापर्यंत केवळ १६२.७० मिलीमीटरच पाऊस झाल्याने अनेक प्रकल्प कोरडे आहे. मात्र मंगळवारी दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचे चित्र निराशाजनकचआहे. मंगळवारी सकाळी ८.३० वाजतापर्यंत या तिन्ही जिल्ह्यात अवघ्या तीन मिमी पावसाची नोंद झाली आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
विदर्भात अतिवृष्टी ; शेकडो गावांचा संपर्क तुटला
By admin | Updated: July 23, 2014 01:03 IST