पुणे : राज्यातील पन्नासपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १९ हजार ५९ गावांपैकी सुमारे १७ हजार गावे विदर्भ व मराठवाड्यातील असल्याचे समोर आले आहे. तसेच पावसाअभावी गेल्या वर्षी पेक्षा येथील जलसाठाही अत्यल्प असल्याने दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली़ पावसाने ओढ दिल्याने व परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम संकटात आहे. याशिवाय पावसाअभावी व भू-जल उपशावर नियंत्रण नसल्याने सुमारे सहा हजार गावांतील पाणीपातळी कमालीची घटली आहे़ यंदा रब्बी हंगाम देखिल अडचणीत सापडला आहे़ कोकण व पुणे विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रावर तीव्र दुष्काळाचे सावट आहे. अवकाळी पावसाने काही पिकांना दिलासा दिला असला तरी ५० हजार हेक्टरवरील डाळिंब, द्राक्ष, भात, केळी, सोयाबीन, नागली व भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.नुकतीच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या जाहीर केली आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्णात सर्वाधिक २ हजार ५० गावे प्रभावित झाली असून, सोलापुर जिल्ह्णात ८० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर खरिपाची लागवड झाली नसल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)
मराठवाड्यासह विदर्भावर दुष्काळाचे ढग दाटले!
By admin | Updated: November 21, 2014 01:55 IST