शीर, नखे गायब : आष्टी तालुक्यात तळेगाव वनपरिक्षेत्रातील घटनातळेगाव(श्या.पं.)जि.वर्धा : आठ दिवसांपूर्वी जुनोना(चुनाभट्टी) शिवारातील एका गोठ्यात तीन शेतकऱ्यांना जखमी करणाऱ्या बिबट्याचा तळेगाव वनपरिक्षेत्रातील त्याच परिसरात मृतदेह आढळला आहे. त्याचे शीर आणि उजव्या पायाची नखे गायब असल्यामुळे शिकारीचा दाट संशय आहे. शुक्रवारी नागपंचमीच्या दिवशी उघडकीस आलेल्या या घटनेने वनविभागात खळबळ उडाली आहे.बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्यामुळे सुमारे चार-पाच दिवसांपूर्वी त्याची हत्या झाली असावी, असा वनाधिकाऱ्यांचा संशय आहे. मात्र तीन शेतकऱ्यांवर हल्ला चढविणारा बिबट हाच की दुसरा याबाबतही ते संभ्रमात आहेत. वनाधिकाऱ्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत सभोवतालच्या तीन कि.मी. परिसराची नाकाबंदी करुन पाहणी केली. यावेळी कोणत्याही संशयास्पद बाबी आढळून आल्या नाही. मात्र शिकाऱ्यांनी सर्वप्रथम विषप्रयोग वा विद्युत करंटच्या माध्यमातून बिबटाची हत्या केली. नंतर त्याचे मुंडके आणि उजव्या पायाची नखे छाटून नेली असावी, असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.आष्टी तालुक्यातील जुनोरा(चुनाभट्टी) शिवारात २५ जुलै रोजी एका गोठ्यात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने बैलासाठी कुटार घ्यायला गेलेल्या वसंता मांडळे या शेतकऱ्यावर हल्ला चढविला होता. त्या शेतकऱ्याच्या मदतीला धावून आलेल्या सुधाकर मांडळे व प्रवीण बहिरमकर या शेतकऱ्यांवरही त्याने हल्ला चढविला. यात तिघेही जखमी झाले. यानंतर बिबट्याला शेतकऱ्यांनी जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले होते. या घटनेनंतर उपवनसंरक्षक मुकेश गणात्रा यांनी जंगल परिसराची पाहणी करुन क्षेत्र सहायक देशमुख व वनरक्षक ढाले यांना गस्तीवर ठेवले होते. गस्त सुरू असतानाच या घटनेच्या आठ दिवसांनी त्याच शिवारात त्या बिबट्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने वनविभागाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. गस्तीवर असलेल्या वनअधिकाऱ्यांना जंगल परिसरात दुर्गंधी येत होती. त्या दिशेने चौकशी केली असता एका झुडपात कुजलेल्या अवस्थेत बिबट्याचे धड आढळले. त्याच्या उजव्या पायाची नखेही नव्हती.यावरुन त्या बिबट्याची शिकार झाली असावी, अशा दाट संशय आहे. माहिती मिळताच उपवनसंरक्षक मुकेश गणात्रा, सहायक वनसंरक्षक मोरेश्वर बोरीकर, वाघमारे, वनपरिक्षेत्राधिकारी व्ही. व्ही. तळणीकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आतिश कोल्हे यांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. यानंतर त्याचठिकाणी मृतदेहावर अग्निसंस्कार करण्यात आले. यावेळी वनरक्षक कापगते, भारद्वाज, वनपाल मारोती धामंदे, मारोती मडावी, अंभोरे, इंगळे, विजय सुतोने, संयुक्त वनविभाग समीतीचे अध्यक्ष अरुण सहारे, सरपंच सुनीता उईके उपस्थित होते. घटनेच्या तपासाकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्यांना जखमी करणाऱ्या ‘त्या’ बिबट्याची शिकार
By admin | Updated: August 3, 2014 00:55 IST