व्याळा (जि. अकोला): अकोला शहराकडे लग्नाचे वर्हाड घेऊन येणार्या वाहनाला भरधाव एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ४ जण ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील व्याळा गावानजीक घडली. या घटनेत चालकासह तीन वर्हाडी जागीच ठार झाले असून ४९ जण जखमी झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे येथील काटे परिवार लग्न सोहळ्य़ासाठी खासगी वाहनाने (एमएच २0 ई-८४६९)अकोला शहराकडे येत होता. यावेळी अकोला ते अंबड (जालना) जाणार्या एसटी बस (क्रमांक एमएच २0-बीएल २२१२) चालकाचे नियंत्रण सुटल्याने वर्हाडींच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत वर्हाडींना घेऊन जाणार्या वाहनाच्या चालकासह अरुण तुकाराम काटे (३५), दीपक अर्जुन लेनेकर (४0), प्रभू शंकर गवळी (४२) तीन वर्हाडी जागीच ठार झाले, तर रुग्णालयात उपचारादरम्यान रवी मोतीराम शहाणे (३८) सर्व राहणार धामणगाव बढे यांचा मृत्यू झाला. उर्वरित ३३ वर्हाडी गंभीर जखमी झाले असून एसटीतील एका चिमुकल्या मुलासह १४ प्रवासी जखमी झाले आहेत. वर्हाडींच्या वाहनाला धडक दिल्यानंतर एसटी बस सुमारे शंभर फूट दूर अंतरावर जाऊन रस्त्यालगतच्या शेतात कोसळली. अपघात होताच महामार्गावरील मालवा धाबा तसेच अंबुजा फॅक्टरीत आलेल्या ट्रक चालकांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघातातील दोन गंभीर जखमींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
व-हाडाच्या वाहनाला एसटीची धडक ४ ठार ४९ जखमी
By admin | Updated: July 13, 2016 01:32 IST