मुंबई : ज्येष्ठ पत्रकार युधिष्ठिर उपाख्य बाबासाहेब जोशी (८१) यांचे आज अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी नलिनी, दोन मुलगे परीक्षित आणि अभिजित, स्रुषा व मोठा आप्त परिवार आहे. १४ डिसेंबर १९३६ रोजी भंडारा येथे जन्मलेले जोशी यांनी सुरुवातीला शिक्षकी पेशा पत्करला. त्यांनी १९६० च्या दशकात नाशिकच्या गावकरीमध्ये पत्रकारितेला प्रारंभ केला. नंतर ते मुंबई सकाळमध्येही होते. लोकमतचे संस्थापक बाबूजी जवाहरलाल दर्डा यांनी त्यांना नागपूर लोकमतमध्ये आणले. तेथे एक दशकभर पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी नागपूर पत्रिका, जनवाद, गावकरीचे संपादक म्हणून पुढे काम पाहिले. भरपूर वाचन त्याला निर्भीड लेखनाची जोड देत ते पत्रकारितेत दीर्घकाळ सक्रिय राहिले. सामाजिक - राजकीय घडामोडींवर त्यांनी वैविध्यपूर्ण लेखन केले. निवृत्तीनंतरही त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये लेखन सुरूच ठेवले होते. आज सायंकाळी येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अभ्यासू पत्रकार हरपलाज्येष्ठ पत्रकार युधिष्ठिर जोशी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून पराकोटीचे दु:ख झाले.‘लोकमत’च्या सुरुवातीच्या काळात लोकमतची उभारणी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ते मेहनती होते तसेच पत्रकारिता ही त्यांची जीवननिष्ठा होती. अभ्यासू पत्रकार अशी त्यांची ओळख होती. अलिकडेच ‘लोकमत’चा इतिहास लिहिण्याचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या दहा वर्षांचा इतिहास प्रकाशितही झाला होता.त्यांच्या निधनाने लोकमतचे आणि मराठी वृत्तपत्र सृष्टीचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी आणि माझा लोकमत परिवार सहभागी आहे. - विजय दर्डा, चेअरमन, लोकमत एडिटोरिअल बोर्ड
ज्येष्ठ पत्रकार युधिष्ठिर जोशी यांचे निधन
By admin | Updated: February 18, 2017 04:10 IST