जमीर सय्यद,नेहरुनगर- पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर मुख्य आगार असुरक्षित बनले असून, विविध समस्यांमुळे हे आगार समस्यांचे आगार बनले आहे. आगारातील पोलीस मदत केंद्र कधी बंद, तर कधी सुरू असते, सीसीटीव्ही कॅमेरे दिखाऊपणासाठीच असल्याचे दिसून येत आहे. आगाराच्या आवारात मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे वाढलेली आहे. कँटीन गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे. आगाराच्या छताचा उपयोग दारू पिण्याचा अड्डा बनला आहे, स्वच्छतागृह वापरण्यासाठी मनमानी पद्धतीने पैसे घेतले जात असल्यामुळे या सर्व कारणांमुळे हे आगार समस्यांचे आगार बनले आहे. वल्लभनगर आगाराचे उद्घाटन १८ वर्षांपूर्वी २२ आॅगस्ट १९९८ मध्ये परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते झाले होते. या आगारातून आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा या तीन राज्यांसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत व त्यामधील विविध तालुके शहरे व विविध खेडेगावात जातात. यामुळे प्रवाशांची या स्थानकावर गर्दी असते. वल्लभनगर आगाराच्या मागच्या आवारात मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे वाढली आहे. कालच एका नराधमाने शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एका इसमाने १९ वर्षीय मुलीला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना वल्लभनगर आगाराच्या मागच्या बाजूला असलेल्या आवारात घडल्यामुळे आगाराचा परिसर किती सुरक्षित व सुरक्षा व्यवस्था किती ढिसाळ आहे, हे सिद्ध होते. या आगारामध्ये जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आलेले आहेत. परंतु ते शोभेचे आहेत की काय, असा प्रश्न या घडलेल्या घटनेमुळे उपस्थित केला जात आहे. याच आगारालगत एक आयटी कंपनी असून, अनेक महिला रात्री-अपरात्री येण्या-जाण्यासाठी या आगारामधून असलेल्या रस्त्याचा उपयोग करीत असतात. या घडलेल्या घटनेमुळे महिलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वल्लभनगर आगारात ३ नोव्हेंबर २०१५ला जंगलामध्ये डुक्कर मारण्यासाठी वापरण्यात येणारे असलेले बॉम्ब सापडले होते. एक बॉम्ब कुत्र्याने खाल्ल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. आगारामधील जेवणाचे कँटीन अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.अनेक नागरिक या आगारात गावाला अथवा इतर जिल्ह्यांत जाण्यासाठी येतात. अनेक वेळा एसटी बसची वाट पाहत असताना एखाद्या प्रवाशाला जेवण अथवा चहा-नाष्टा करायचा असेल, तर त्यांना एसटी बस आगाराच्या बाहेर जावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या पाणपोयी व नळांची दुरवस्था झालेली आहे. तसेच महिला प्रवासी मातांसाठी असलेला हिरकणी कक्षदेखील वापराअभावी धूळ खात पडला असून, या केंद्रामध्ये अडगळीच्या वस्तू ठेवल्या आहेत.डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आगारामध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक नादुरुस्त एसटी बस वाढल्या असून, या आगाराची जागा व्यापली जात आहे. >लोकमत प्रतिनिधीने सकाळी १०च्या सुमारास वल्लभनगर आगाराची पाहणी केली असता, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलीस मदत केंद्र सुरू होते. परंतु या केंद्रात कोणीही बसलेले नव्हते. आगाराच्या छताची पाहणी केली असता, छतावर जागोजागी दारूच्या बाटल्या आढळून आल्या असून, अनेक चालक या ठिकाणी दारू पित असल्याचे उघडकीस आले आहे. छतावर मिळालेल्या बाटल्यांमुळे अनेक चालक दारू पित असल्याचे आढळून आले असून, ही प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गंभीर बाब आहे. याच बरोबर आगाराच्या मागच्या आवारात मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे, अस्वच्छता वाढलेली असून, एक बंगलाही बंद अवस्थेत धूळ खात आहे.
वल्लभनगर एसटी आगार असुरक्षित
By admin | Updated: January 16, 2017 01:23 IST