रवींद्र सोनावळे, शेणवामहाराष्ट्र शासनाने शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत पुरवठा केलेल्या लसीकरणाच्या औषधात दोष आढळल्याने गुरुवारी किन्हवली येथे होणारे लसीकरण सत्र रद्द करण्यात आले. ठाणे जिल्हा परिषदेने सर्व आरोग्य केंद्रांना तातडीचे आदेश देऊन त्या सदोष औषधावर बंदी घातली आहे. लसीकरण सत्र रद्द झाल्याने बालकांना कुठलेही उपचार न घेता घरी परतावे लागले.या आरोग्य केंद्रात गुरुवारी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना आवश्यक लस देण्यात येणार होत्या. त्यासाठी सत्र आयोजित करण्यात आले होते. या वेळी क्षयरोग, डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात, कावीळ, पोलिओ आदींवर प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार होती. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या औषध विभागातून ठाणे जिल्हा परिषदेला पुरविण्यात येणाऱ्या हैदराबाद येथील ‘मून बायोलॉजिकल इन्स्टिट्यूट’ या कंपनीच्या हेपिटायटीस (कावीळ) इलोरॅक-बी या औषधात दोष आढला. त्यामुळे ठाणे जि.प.च्या आरोग्य विभागाने २७ डिसेंबर २०१४ रोजी तातडीचा आदेश काढून या औषधाच्या वापरावर बंदी आणली होती. परंतु, या आदेशाला १० दिवसांचा कालावधी होऊनही किन्हवली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी पी.जी. महाले यांनी ही औषधे मागविण्यात हलगर्जीपणा केला. त्यामुळे ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना ही लस न घेताच घरी परतावे लागले. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मुगाव, अस्नोली, अल्याणी, नांदगाव ही चार उपकेंद्रे असून २० गावे व २२ पाड्यांचा समावेश आहे.
सदोष औषधांमुळे लसीकरण रद्द
By admin | Updated: November 7, 2014 04:48 IST