यदु जोशी, मुंबईअकुशल आणि असंघटित कामगारांसाठी नवे कल्याण मंडळ स्थापण्यात येणार आहे. त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्यासाठीच्या योजनांची अंमलबजावणी अशी जबाबदारी या मंडळावर असेल. तसेच, त्यांचे वेतन या मंडळामार्फत होईल. मंडळाचे स्वरूप आणि कामगार कायद्यात काही सुधारणा याबाबत अभ्यास करून सरकारला अहवाल देण्यासाठी तीन सदस्यांची एक समिती नियुक्त केली जाणार आहे, अशी माहिती विभागाच्या सूत्रांनी दिली. उद्योग आणि कामगारांमध्ये होणाऱ्या वादांसंदर्भात ही समिती अभ्यास करेल. किमान वेतनाचीही समिती शिफारस करेल. नव्या कल्याण मंडळाचे स्वरुप काय असावे, याबाबत समिती शिफारशी करेल. या मंडळाच्या कार्यकक्षेत कंत्राटी कामगारांना, टॅक्सी आणि आॅटो चालकांना आणले जाईल. असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा कायद्याद्वारे (२००१) संरक्षण देण्यात आले आहे. तथापि, याच कायद्यातील तरतुदीनुसार त्यांच्यासाठी स्वतंत्र असे मंडळ मात्र स्थापन होऊ शकलेले नव्हते. आता त्यासाठी हालचाली वेगाने सुरू आहेत. ७० प्रकारच्या कामगारांना नव्या मंडळाच्या अखत्यारित आणले जाईल. उद्योग आणि सेवा क्षेत्रातील कामगारांची या नव्या मंडळांतर्गत नोंदणी करण्यात येईल. मालकांना वेतन मंडळाकडे जमा करावे लागेल. तसे झाल्याने कामगारांची आर्थिक पिळवणूक होणार नाही. कामगारांच्या कल्याणासाठी मालकांना विशिष्ट रक्कम मंडळाला द्यावी लागणार आहे.
असंघटित कामागारांचे वेतन मंडळामार्फत!
By admin | Updated: September 24, 2015 01:57 IST