विदर्भातील अर्जात त्रुटी : पुणे, औरंगाबाद, सोलापूरचे परिपूर्ण प्रस्ताव पुणे : राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून निधी मिळविण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने मागविलेल्या प्रस्तावावर कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ तसेच एसएनडीटी व मुंबई विद्यापीठाने उदासीनता दाखवली आहे. पुणे, औरंगाबाद, सोलापूर व जळगाव येथील विद्यापीठांनी पाठविलेले परिपूर्ण प्रस्ताव लवकरच राज्य शासनाकडे सादर होतील.‘रुसा’चा निधी मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘स्टेट कौन्सिल आॅफ हायर एज्युकेशन’ची स्थापना करण्यात आली नव्हती. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून आवश्यक असलेल्या बाबींकडे शासनाने गांभिर्याने लक्ष दिले, असे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मंत्रिमंडळाने २१ एप्रिल रोजी ‘रुसा’ला मंजुरी दिली. परंतु, काही विद्यापीठांनी याबाबत उदासीनता दाखविल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी) शिवाजी विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाने मात्र या महत्त्वाच्या योजनेकडे पाठच फिरवली. त्यांच्या प्रतिनिधींनी उच्च शिक्षण संचालनालयाशी संपर्कही साधला नाही. शासकीय महाविद्यालयांचे प्रस्ताव गुरूवारी संचालनालयाकडे प्राप्त होणार आहेत. ‘स्टेट कौन्सिल आॅफ हायर एज्युकेशन’ची स्थापना करण्याचे काम सुरू असून ‘रुसा’च्या समितीवर दोन कार्यरत व एका माजी कुलगुरूंची निवड करण्यात आली आहे. ‘रुसा’च्या अध्यक्षपदी संगणक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाकडे १५२ कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे.आघाडी शासनाच्या काळात १३० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
‘रुसा’च्या निधीबाबत विद्यापीठे उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2015 03:24 IST