- संदीप आडनाईक, कोल्हापूर
‘आधी केले, मग सांगितले’ ही उक्ती प्रत्यक्षात आणणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच असतात. कोल्हापुरातील शिक्षक मिलिंद यादव हे त्यापैकीच एक. काही वर्षांपूर्वी शाळेच्या परिसरातील पाण्याचे वाहते नळ बंद करण्यास त्यांनी प्रारंभ केला आणि ते कार्य त्यांनी व्रत म्हणून स्वीकारले. प्रिन्स शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये कलाशिक्षक असलेल्या मिलिंद यांनी जीवन बोडकेसारख्या अवघ्या सहा मित्रांच्या मदतीने मूर्तिदान, निर्माल्यदान या चळवळीला १९८५मध्ये प्रारंभ केला होता. ‘चिल्लर पार्टी’सारख्या उपक्रमातून लहान मुलांमध्ये चित्रपट चळवळ जोपासण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. जुना बुधवार पेठेतून शाळेला जाता-येता या परिसरातील महिला आणि नागरिक घरासमोरील पाण्याचे नळ गरज नसताना सुरू ठेवत असल्याचे त्यांनी पाहिले. सुरुवातीला त्यांनी समजावून सांगितले; परंतु फारसा प्रतिसाद न मिळाल्यानंतर त्यांनी स्वत:च ते नळ बंद करण्यास सुरुवात केली. - अलीकडेच त्यांनी आपल्या शाळेत विद्यार्थी आणि पालकांना पाणी वाचविण्यासंदर्भात तसेच दुष्काळाची, विशेषत: मराठवाड्यातील गंभीर स्थिती दाखविण्यासाठी स्लाईड-शोचे आयोजन केले. - शाळेतील एका पाण्याच्या नळाून गळणारे पाणी किती वाया जाते, याचे मिलिंद यांनी एकदा चित्रीकरण केले, तेव्हा एका मिनिटात २५0 मिलिलीटर पाणी वाया गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग एका तासात वाया गेलेल्या १५ लीटर पाण्याच्या हिशेबात महानगरपालिकेला वर्षाला ५६२९ रुपये इतके विनाकारण भरावे लागल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जनजागृती सुरू केली.