अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. राज्य महामार्गाला समांतर भुयारी गटराच्या वाहिनीचे काम सुरु आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेऊन कंत्राटदाराने काँक्रिटचा रस्ता खोदून ते काम पूर्ण केले. मात्र रस्ता पूर्ववत करतांना कामाचा दर्जा मात्र नित्कृष्ट ठेवला आहे. त्यामुळे भविष्यात हा रस्ता खराब होण्याची भीती आहे.राज्य महामार्गाचे काम होऊन वर्षही उलटत नाही तो भुयारी गटाराच्या कामासाठी हा रस्ता खोदण्यात आला. हा रस्ता खणताना काम झाल्यावर आहे त्याच दर्जाचा रस्ता पुन्हा तयार करुन देण्याची जबाबदारी कंत्राटदारावर टाकली आहे. संबंधित भुयारी गटार योजनेच्या कंत्राटदाराने ७० मीटर रस्ता या कामासाठी खोदला. तसेच भुयारी मार्ग टाकून ते काम पूर्ण केले. मात्र रस्ता पूर्ववत करुन देण्याची जबाबदारी कंत्राटदाराचीच असल्याने त्याने ते कामही सुरु केले. मात्र त्या कामाचा दर्जा हा अत्यंत नित्कृष्ट ठेवला आहे. काम झालेल्या ठिकाणी खडी टाकून त्यावरच वरवर काँक्रिट टाकण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर रस्त्यासाठी १२ इंचाचे काँक्रिट भरणे अपेक्षित आहे. मात्र तसे न करता कंत्राटदाराने ८ ते १० इंचाचेच काँक्रिट भरले आहे. या रस्त्याची पाहणी करण्यासाठी पालिकेचे अभियंते गेले असता त्यांच्यासमोर काँक्रिट चांगले भरत असल्याचे भासविण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांची पाठ फिरताच पुन्हा संबंधित कंत्राटदाराने कमी जाडीचे काँक्रिट भरले आहे. तसेच भरण्यात येणारे काँक्रिट हे जुन्या रस्त्याला जुळणे गरजेचे आहे. मात्र त्या ठिकाणची माती न काढल्याने नवा आणि जुना रस्ता यांच्यात मोठी भेग पडली आहे. त्यामुळे हा रस्ता खराब होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
भुयारी गटारावरील रस्त्याचे काम निकृष्ट
By admin | Updated: April 29, 2016 04:24 IST