मुंबई : बृहन्मुंबईतील वायू, जल प्रदूषण, प्रक्रिया न करताच सांडपाणी समुद्रात सोडून देण्याची पद्धत, घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यातील बेपर्वाई याबाबत लोकसभेच्या स्थायी समितीने शुक्रवारी राज्य सरकारची हजेरी घेतली. बृहन्मुंबईत पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याबाबत नाराजी प्रकट करण्यात आली. मात्र त्याचवेळी बृहन्मुंबईतील लोंढे हे या समस्यांचे एक प्रमुख कारण असल्याचेही समितीचे अध्यक्ष अश्विनीकुमार यांनी पत्रकार परिषदेत कबूल केले.विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वने याबाबतची लोकसभेची स्थायी समिती दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर आली असून, त्यांनी पर्यावरणविषयक सामाजिक संस्था, मच्छीमार संघटना, उद्योगांचे प्रतिनिधी, शहरनियोजन तज्ज्ञ आदींशी चर्चा केली. त्यानंतर राज्य सरकार व मुंबई महापालिकेच्या उच्चाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. स्थायी समितीच्या काही सदस्यांनी सांगितले की, बृहन्मुंबईत वायू, जल प्रदूषणाचे काही गंभीर प्रश्न आहेत. मिठी नदीचे प्रदूषण, समुद्रात कुठलीही प्रक्रिया न करता सोडले जाणारे मैलापाणी तसेच घनकचऱ्याची प्रक्रिया न करता विल्हेवाट लावणे यामुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झालेले आहेत. समुद्रातील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. राज्यात पर्यावरणविषयक नियमांची पायमल्ली होत असल्याबाबत राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांकडे समितीने स्पष्टीकरण मागवले. तिवरांची होणारी कत्तल ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचेही समितीने नमूद केल्याचे काही सदस्यांनी सांगितले. समितीचे अध्यक्ष अश्विनीकुमार म्हणाले की, देशातील प्रमुख शहरांच्या लोकसंख्येत येत्या काही वर्षांत ३० कोटी लोकांची भर पडणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
बृहन्मुंबईतील प्रदूषणाबाबत बेपर्वाई
By admin | Updated: January 31, 2015 05:33 IST