ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 8- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिवसेना-भाजपमधील वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही सदिच्छा भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपमधील वाद मोठ्या प्रमाणात चव्हाट्यावर आले आहेत. एवढंच नाही तर सत्तेत असूनही शिवसेनेच्या आमदारांची कामं होत नसल्याची भावना शिवसेनेच्या आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या कानावरही घातली होती. मात्र त्यासंदर्भात मुख्यमंत्री कारवाई करत नसल्यानं शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
दोन वर्षांतील प्रलंबित कामांची यादी सेनेने तयार केली असून, ती यादी सोपवण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचे आमदार आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही पदाधिकारीही उपस्थित आहेत.