ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - शेतक-यांच्या आत्महत्येवर औषध सापडत नसल्याने मुख्यमंत्र्यांना लाज वाटते, पण त्याचा उपयोग काय असा खोचक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. केंद्रात व राज्यात सत्ता परिवर्तन झाले असले तरी शेतक-यांची दुर्दशा संपलेली नाही असे टीकास्त्रही त्यांनी सोडले आहे.
मंगळवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांन भाजपावर निशाणा साधला. आता शिवसेनेने शेतक-यांच्या आत्महत्येवरुन सत्ताधारी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. शेतकरी कष्ट करत असला तरी त्याला अपेक्षीत फळ मिळत नाही. सध्या लाटेवर व हवेवर निवडणुका जिंकता येतात आणि मंत्री, मुख्यमंत्री होता येते. पण शेतकर्यांना अशी लाट किंवा हवा जीवदान देऊ शकत नाही असा सणसणीत टोला त्यांनी लगावला आहे. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या प्रगतीला नवी उंची मिळेल असा आशावाद व्यक्त करतानाच शेतक-यांच्या आत्महत्येने लाज वाटते असे विधान केले होते. यावरुन टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकरी आत्महत्या करणार नाही याची दक्षता घेणे हे सरकारचे कर्तव्य असते. फक्त भाषणात लाज वाटून उपयोग नसून प्रत्यक्षात कृती करणे अधिक गरजेचे आहे असा चिमटाही त्यांनी काढला आहे. विदर्भातील शेतक-यांशी संवाद घेणा-या राहुल गांधींनी मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात विदर्भातील शेतक-यांना जाहीर झालेला पॅकेज, यूपीए सरकारने दिलेली आश्वासनं याचा लेखाजोखा मांडावा असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.