सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातशिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ये दोघेही भाऊ मराठीच्या मुद्द्यावर येकत्र येताना दिसत आहेत. यासंदर्भात आता, पूर्वीचे बाळासाहेबांचे कट्ट्रर शिवसैनिक आणि आताचे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांनी थेट भाष्य केले आहे. "हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी माणसाच्या जीवनात परिवर्तन कोणते? सांगावे ना. फक्त यांच्या स्वार्थासाठी एकत्र येत आहेत," असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. ते एका महाठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
मुलाखतीवेळी, तुम्ही जर बाळासाहेबांना दैवत मानता, तर दोन भाऊ एकत्र येण्याचा तुम्हालाही आनंद वाटायला हवा? असा प्रश्न विचारला असता, राणे उपरोधिकपणे म्हणाले, "केवढा आनंद होतोय, मी शब्दात सांगू शकत नाही, एवढा आनंद होतोय. आनंद म्हणजे काय...? अशक्य गोष्ट शक्य झाली, बाकी काही नाही झालं. अजून झाले नाही, एक होतील, एकत्र येतील तेव्हा आणि एकत्र येऊदे नांदू देना. नांदू दे...," असे राणे म्हणाले. एवढेच नाही तर, मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका. आता मुंबईत किती टक्के मराठी राहिलेत? किती मराठी लोकं ठेवलीत? मराठी माणसाठी जन्माला आलेली शिवसेना आज काय स्थिती आहे?" असे प्रश्नही त्यांनी केले. ते एबीपी माझासोबत बोलत होते.
50-60 वर्षे झाली. 59 वर्ष तुम्ही बाळासाहेबांसोबत काम केले. आजही या पक्षाला मराठी माणसासाठी झगडावे लागत आहे, भांडावे लागत आहे, याला काय म्हणायचे? यावर बोलताना राणे म्हणाले, "सत्तेवर येणारे अथवा आलेले, यांनी खऱ्या अर्थाने मराठी माणसासाठी असा काही ठसा उमटवला नाही. सोयीचे राजकारण, आपल्या फायद्याचे, आपल्या कुटुंबाचे, एवढेच केले."
आता दोन भाऊ एकत्र येत आहेत, त्यालाही सोयीचेच राजकारण म्हणावे का? असे विचारले असता राणे म्हणाले, "म्हणजे काय? सगळीकडून दारुण पराभव झाल्यानंतर, अस्तित्व संपल्यानंतर, त्यांना वाटतेय एकत्र येऊन बघा. पण लोकांसाठी काय केलं? हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी माणसाच्या जीवनात परिवर्तन कोणते? सांगावे ना. एक-एक मिठाईचा पुडा तरी पाठवणार का प्रत्येक कुटुंबाला? फक्त यांच्या स्वार्थासाठी एकत्र येत आहेत. यांनी बाळासाहेबानंतरची सत्ता वैयक्तिक स्वार्थ, पैसा आणि पदासाठीच, हिंदूत्वचा त्याग करून शरद पवार आणि काँग्रेसबरोबर गेले आणि मुख्यमंत्री झाले." असा टोलाही राणे यांनी यावेळी लगावला.