राज्य सरकारने पहिल्या १०० दिवसांच्या प्रकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केली होती. १ एप्रिलपासून वीज बिले कमी होतील. ही केवळ घोषणाच ठरली आहे. तिची अंमलबजावणी केली गेली नाही. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन नागरीकांना एप्रिल फूल बनवले असल्याचा आरोप उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केला आहे.
डोंबिवली वीज बिलाच्या वसूलीत अव्वल असताना डोंबिवली शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडीत केला जातो. त्यामुळे नागरीक हैराण आहेत. त्याचबरोबर नागरिकांकडून भरमसाठ बिले आकारली जातात. या संदर्भात वीज वितरण कंपनीच्या कल्याण कार्यालयातील मुख्य कार्यकारी अभियंता चंद्रमणी मिश्रा यांची उद्धव सेनेच्या शिष्टमंडळाने आज भेट घेतली. यावेळी उद्धव सेनेचे पदाधिकारी तात्या माने, वैशाली दरेकर, अभिजीत सावंत, प्रमोद कांबळे, प्रकाश तेलगोटे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाबाबत म्हात्रे यांनी मिश्रा यांना विचारणा केली. त्यांच्याकडे यावर कोणतेही उत्तर नव्हते. डोंबिवली शहरात डीएफसी रेल्वे प्रकल्पाचे काम सुरु आहे. या प्रकल्पाच्या ठेकेदाराने वीज वितरण कंपनीची परवानगी न घेता वीजेच्या केबल वायर तोडल्या आहे. त्यामुळे डोंबिवली शहरातील वीज पुरवठा खंडीत होत आहे. १० तास वीज पुरवठा खंडीत होता. या प्रकरणी ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी उद्धव सेनेकडून करण्यात आली. त्याचबरोबर रस्ते विकासाची कामे आहे. रस्त्यावर असेलेली विद्युत रोहित्रे योग्य ठिकाणी हलविण्यात यावीत. शहरातील वीज पुरवठा सुरळित ठेवण्यात यावा. वीज पुरवठा खंडीत झाल्यास उद्धव सेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतचार महिन्यात निवडणूका घ्या असे आदेश सर्वेाच्च न्यायालयाने दिले आहे. या निर्णयाचे म्हात्रे यांनी स्वागत केले आहे. हा भारतीय लोकाशाहीचा विजय आहे. लोकशाही संपविण्याचे काम भाजपने गेल्या अडीच वर्षापासून राज्यात केले होते. सरकार फोडणे, आमदार फोडणे, निव्वळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी निवडणूका घेतल्या नाहीत. त्यांना न्यायालयाने दणका दिला आहे असे म्हात्रे यांनी सांगितले.