मालेवाडा भागातील घटना : सी-६० व स्पेशल अॅक्शन ग्रुपची कारवाईकुरखेडा (गडचिरोली) : कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलीस ठाण्यापासून जंगल परिसरात पाच किमी अंतरावर मंगळवारी सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास पोलीस व नक्षलवादी यांच्या चकमक उडाली. या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळी पोलिसांना एक एसएलआर व थ्री नॉट थ्री रायफल मिळाली आहे. क्रिष्णा ऊर्फ राजू देवीदास ठाकूर (३५) रा. इंदिरानगर राजुरा जि. चंद्रपूर व सोनू ऊर्फ दशरथ मण्याजी काटेंगे (२५) रा. बेडगाव घाट ता. कोरची जि. गडचिरोली अशी मृत नक्षलवाद्यांची नावे आहेत. क्रिष्णा ठाकूर हा नक्षल चळवळीत २००८ पासून कार्यरत होता. तो प्लाटून क्र. ५५ चा दलम मेंबर होता. सोनू २००७ पासून नक्षल चळवळीत कार्यरत होता. तो सध्या प्लाटून क्र. ५६ चा डेप्युटी सेक्शन कमांडर म्हणून काम करीत होता, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. या घटनेत तीन ते चार नक्षलवादी मारले गेले व जखमीही झाले, असा दावा पोलीस अधीक्षकांनी केला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिसांच्याविरूद्ध मोठी कारवाई करण्यासाठी मालेवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवादी फिरत असल्याची माहिती गडचिरोली पोलीस दलाचे सी-६० पोलीस पथक व स्पेशल अॅक्शन ग्रुप यांना मिळाली होती. त्याआधारे त्यांनी मालेवाडा जंगल परिसरात नक्षलविरोधी शोध मोहीम सुरू केली. मंगळवारी सकाळी ८.१५ वाजता मालेवाडापासून पाच किमी अंतरावर खोब्रामेंढा, आस्वलझोरा जंगल परिसरात नक्षलवाद्यांसोबत पोलिसांचा थेट सामना झाला. या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. या घटनेत टिपागड, खोब्रामेंढा दलमचे नक्षलवादी सहभागी असल्याची शक्यता आहे. या चकमकीत आणखी काही नक्षलवादी ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. (प्रतिनिधी)
चकमकीत दोन नक्षलवादी ठार
By admin | Updated: August 13, 2014 00:42 IST