अकोला: किडनी तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपी सांगली जिल्हय़ातील शिवाजी कोळी आणि बुलडाणा जिल्हय़ातील विनोद पवार हे रविवारी पोलिसांच्या हाती लागले. विनोदला पोलिसांनी रविवारी बुलडाणा जिल्हय़ातील मांडवा येथून अटक केली. न्यायालयाने त्याला ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सांगली जिल्हय़ातील इस्लामपूर येथील शिवाजी कोळी यालासुद्धा पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली.किडनी तस्करी प्रकरणामध्ये दिवसेंदिवस आरोपींची संख्या वाढत आहे. देवेंद्र सिरसाट व आनंद जाधव या दोघांना अटक केल्यानंतर, त्यांच्याकडून पोलिसांना काही नावे मिळाली. त्याआधारे स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तपास करून नागपूर, औरंगाबाद आणि सांगली येथे पोलीस पथके पाठविली. नागपूर आणि औरंगाबाद येथील चार डॉक्टर आणि औरंगाबाद येथील एका इस्पितळाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यास अकोल्यात आणून शनिवारी त्यांची चौकशी करण्यात आली. आता शिवाजी कोळीलाही ताब्यात घेतले असले तरी, पोलिसांनी त्याच्याबाबतीत रविवारी रात्रीपर्यंत गुप्तता बाळगली. रविवारी रात्री कोळीला अटक केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यानंतर पोलिसांनी रविवारी तिसरा आरोपी विनोद पवार याला गजाआड करून अकोल्यात आणले. शांताबाई खरात हिच्या तक्रारीनुसार, ५ लाख रुपयांमध्ये किडनी विकण्यासाठी आनंद जाधव व देवेंद्र सिरसाट यांनी बुलडाणा जिल्हय़ातील मेहकर तालुक्यातील मांडवा येथील विनोद पवार याच्याशी तिची ओळख करून दिली. त्यानंतर पवार हा शांताबाईला औरंगाबाद येथे घेऊन गेला होता. तेथे तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर किडनी काढण्यात आली होती. या मोबदल्यात तिला ५ लाख रुपयांऐवजी ३ लाख रुपयेच देण्यात आले. आपली फसगत झाल्याचे शांताबाईच्या लक्षात आले. परंतु ती गप्प होती. संतोष गवळी याने किडनी तस्करीचे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर शांताबाईनेसुद्धा जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे धाडस केले. *तपासासाठी आता दोन पथकंकिडनी तस्करी प्रकरणाची व्याप्ती पाहता, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी तपासासाठी दोन पथकं नियुक्त केली आहेत. जुने शहर पोलीस ठाण्यातील तक्रारीच्या तपासाची जबाबदारी खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक छगनराव इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दुसरीकडे किडनी तस्करी प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जितेंद्र सोनवणे यांच्याकडे आहे.
आणखी दोन आरोपी पोलिसांच्या जाळय़ात!
By admin | Updated: December 7, 2015 02:44 IST