तिरोडा (जि़ गोंदिया) : दोन महिन्यांपासून घरात चूल पेटली नाही, पोटात अन्नाचा कण नाही, त्यातच हाडाचा पिंजरा झालेला.. अखेर हवापाण्यावर जगणार तरी किती दिवस?.. आधार देणारा कोणीही मागे नसताना पोटच्या दोन मुलांना सोडून तिने शनिवारी अखेरचा श्वास घेतला. अन्नावाचून बळी जाण्याच्या या दुर्दैवी प्रकाराने संपूर्ण विदर्भ हळहळला. मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधीने या प्रकाराची दखल घेतली नाही. या असंवेदनशीलतेवर संताप व्यक्त केला जात आहे.तिरोड्यातील जगजीवन वॉर्डातील ललिता शिवकुमार रंगारी (४१) हिची ही दुर्दैवी कहानी आहे. तिच्या पतीचे पाच वर्षांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे दोन मुलांसह ती एकाकीपणे कसेतरी जगत होती. तिचा लहान मुलगा गराडा येथे मामाकडे सातव्या वर्गात शिक्षण घेत आहे, तर मोठा मुलगा अठरा वर्षांचा असून, तो गतिमंद आहे. या महिलेचे नाव दारिद्र्यरेषेखालील यादीत आहे. मात्र तिचे रेशन कार्ड पूर्णत: फाटलेले होते. मागील सहा महिन्यांपासून बीडीचे पेन्शनही तिला मिळाले नसल्याचे सांगण्यात येते. बँक पासबुकवर पैसे जमा झाल्याची कोणतीही नोंद नाही.तिचा भाऊ विश्रांत बागडे म्हणाले की, ललिताची प्रकृती बरी नसल्याचे कळले होते. परंतु माझ्या मोठ्या मुलाचा अपघात झाल्याने आम्ही येऊ शकलो नाही.मुलांच्या पालनपोषणासाठी कोण पुढाकार घेणार?च्ललिता रंगारी यांना मिळालेल्या घरकुलाची स्थिती फारच दयनीय आहे. मागील दार तुटलेले असून खिडकीला पल्ले व ग्रील नाही. छत (स्लॅब) गळत आहे. पण जिथे पोटाची खळगी भरण्याचीच सोय नाही तिथे घर-दार दुरुस्ती करण्यासाठी कोठून पैसे आणणार? आता ललिताबाईची दोन्ही मुले पोरकी झाली आहेत.च्एका मुलाचा सांभाळ मामा करीत आहे. मात्र दुसऱ्या गतिमंद मुलाचे पालनपोषण कोण करणार? आधीच अंधकारमय झालेल्या त्याच्या जीवनाला कोणी सामाजिक संस्था प्रकाशाची किरणं दाखविणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.मुलगाही रुग्णालयात : नगराध्यक्ष अजय गौर व इतर मित्रमंडळींनी ललिता रंगारी यांचा गतिमंद मुलगा बुद्धघोष याला तिरोडाच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले. तोसुद्धा कुपोषित आहे. औषधोपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या त्या मुलाला आता निराधार योजनेचे पैसे मिळणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी येऊन दिखाऊ पाहणी केल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.
दोन महिन्यांपासून पेटली नाही ‘तिच्या’ घरात चूल
By admin | Updated: June 29, 2015 02:20 IST