ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 17 - भडकलेल्या तुरडाळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व सर्वसामान्य कुटुंबांना ती उपलब्ध व्हावी यासाठी रेशन दुकानांवर उपलब्ध करून दिली जात आहे. त्यासाठी जिल्ह्यातील दोन लाख १० हजार शिधापत्रिकाधारकांना २१०२.७६ क्विंटल तूरडाळीचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. याच महिन्यात तूरडाळीचे वाटप करण्यात येणार आहे.तूरडाळीचे भाव गेल्या दोन वर्षांपासून वाढतच आहे. सर्वसामान्यांच्या जेवनातू डाळ हद्दपार होते काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. डाळीचा काळाबाजार आणि साठवणूक देखील केली जात असल्यामुळे व्यापाऱ्यांची गुदामे देखील तपासण्यात आली होती. गेल्यावर्षी तब्बल २०० रुपये किलोपर्यंत तूरडाळ गेली होती. सद्यस्थितीत देखील १४० ते १७० रुपये किलो या दराने तूरडाळ विक्री होत आहे. त्यामुळे सामान्य कुटूंबांना ती परवडणारी नाही. ही बाब लक्षात घेता शासनाने रेशन दुकानांवर डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्याला नियतन मंजुर झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी दिली. अंत्योदय अन्न योजना आणि बीपीएल योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अर्थात १०३ रुपये किलो प्रति शिधापत्रिका एक किलो तूरडाळ वितरण करण्यात येणार आहे. सर्वसामान्य गरीब कुटूंबांची यामुळे मोठी सोय होणार आहे. सणासुदीच्या काळात त्यांना डाळ उपलब्ध होणार असल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
दोन लाख कुटुंबांना मिळणार १०३ रुपये किलोप्रमाणे तूरडाळ
By admin | Updated: August 17, 2016 17:45 IST