वाशिम : कर्जाचा वाढता डोंगर आणि नापिकीला कंटाळून वाशिम जिल्ह्यातील आणखी दोन शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळले. एका युवा शेतकर्याने गळफास घेतला, तर एका महिला शेतकरीने जाळून घेऊन आत्महत्या केली. मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील २२ वर्षीय युवा शेतकर्याने आत्महत्या केली. संदीप दुर्योधन शेळके असे मृताचे नाव आहे. तो १६ जुलै रोजी शेतात जात असल्याचे सांगून घरून गेला; मात्र तो दुसर्या दिवशीही घरी परत न आल्याने, कुटुंबियांनी शोध सुरू केला. शुक्रवारी सकाळी गावातील एका शेतामध्ये निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळला. दुसर्या एका घटनेत, वाशिम तालुक्यातील काटा येथील ५५ वर्षीय महिलेने शेतातील पिकं सुकल्याने आणि कर्ज परतफेडीच्या चिंतेतून शुक्रवारी दुपारी स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली. दुर्गाबाई पंडीतराव देशमुख हे मृताचे नाव आहे. त्या शुक्रवारी नेहमीप्रमाणे शेतामध्ये गेल्या असता, करपलेली पिकं पाहून त्यांना चिंतेने ग्रासले. शेतातून घरी परतल्यानंतर दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास त्यांनी जाळून घेऊन जीवनयात्रा संपविली. त्यांच्यावर बँकेचे आणि खासगी सावकाराचे मिळून दोन लाखाचे कर्ज असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
नापिकीला कंटाळून दोन शेतक-यांच्या आत्महत्या
By admin | Updated: July 18, 2015 01:24 IST