ऑनलाइन लोकमत
बीड, दि. १ - शहरामध्ये सोमवारी रात्री ९ वाजता दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी जालना रोडवर दोन बसवर दगडफेक करून दहशत निर्माण केली. दरम्यान, तोडफोडीनंतर त्यांनी बसचे फोटोही मोबाईलवर घेत पोबारा केला.
शांताई हॉटेल व मुक्ता लॉन्स येथे या घटना घडल्या. एमएच-४० बीएल-४०७३ या औरंगाबादकडे जाणाºया विनाथांबा बसवर शांताई हॉटेलजवळ दगडफेक झाली. याशिवाय मुक्ता लॉन्ससमोरही एक बस (क्र. एमएच-१४ बीटी-१९४७) फोडली. यामध्ये कोणीही जखमी नसल्याचे बीडचे आगार प्रमुख ए.ए. जानराव यांनी सांगितले. बसच्या समोरील काचा फुटल्या असून, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. औरंगाबाद व बार्शीकडे जाणाºया रस्त्यावर कर्मचारी रवाना केले असून, दगडफेक करणाºयांचा शोध सुरू असल्याचे कस्तुरे यांनी सांगितले. दगडफेकीमागचे कारण स्पष्ट नसून रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू होते.