वाडा : तालुक्यातील तुसे-मोज या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात आलेल्या पुलाच्या निकृष्ट बांधकामाबाबत आमदार पांडुरंग बरोरा यांनी मुख्य अभियंत्याकडे तक्रार केली असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता या पुलाचे काम आपल्या मतदारसंघातील असून शासनाने या कामासाठी ८० लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे ठेकेदार स्वत:च्या स्वार्थासाठी निकृष्ट दर्जाचे काम करून शासन व जनतेची फसवणूक करत असेल तर अशा कामांची सखोल चौकशी होऊन संबंधित ठेकेदारावर व त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्याचप्रमाणे आपल्या मतदारसंघातील झालेल्या इतर विकासकामांचीही आपण माहिती घेणार असून वेळ पडल्यास विधानसभेत येत्या अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
तुसे-मोज पुलाच्या निकृष्ट बांधकामाचा विचारला जाब
By admin | Updated: June 28, 2016 03:15 IST