योगेश पांडे/ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 15 - झाड झडूले शस्त्र बनेंगे,फूल बनेगी सेना...या शब्दात राष्ट्राभिमान जागवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व देव बाजाराचा भाजीपाला नाही रे...हे सांगत अंधश्रद्धेवर प्रहार करणारे संत गाडगेबाबा हे समाजाचे वैचारिक दैवत. प्रत्येक भारतीयाने त्यांना कायमच आपल्या मनमंदिरात सन्मानाचे स्थान दिले आहे. परंतु , राज्य शासनाच्या लेखी मात्र हे दोघेही राष्ट्रपुरुष नाहीत. वाचून धक्का बसेल, पण हे खरे आहे. २०१७ मध्ये राज्यातील सर्व विद्यापीठांत राष्ट्रपुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती साजरी करण्यासंदर्भातील परिपत्रकात या दोन्ही महान व्यक्तींच्या नावाचा साधा उल्लेखदेखील करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, शासनाने हा करंटेपणा तेव्हा केलाय जेव्हा या दोन समाजदैवतांच्या नावावर महाराष्ट्रातील दोन विद्यापीठे उद्याचे नागरिक घडविताहेत. असा उरफाटा निर्णय घेऊन या विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांसह या दोन्ही समाजदैवतांच्या अनुयायांना शासनाला नेमका कोणता संदेश द्यायचा आहे, असा प्रश्न आता विचारला जात आहे. ुराज्यातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयांत राष्ट्रीय सणांसोबतच वर्षभर राष्ट्रपुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती साजरी करण्यात येते. यासंदर्भात राज्य शासनाकडून दरवर्षी परिपत्रक काढण्यात येते. २०१७ सालाबाबतदेखील राज्य शासनाने परिपत्रक काढले. त्या अनुशंगाने उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.धनराज माने यांनी सर्व विद्यापीठे तसेच विभागीय सहसंचालकांना पत्राद्वारे निर्देश दिले. यासोबतच १५ आॅगस्ट व २६ जानेवारी वगळता २८ विविध दिवसांची यांदी जोडण्यात आली. या यादीमध्ये देशाला दिशा देणारे विविध राष्ट्रपुरुष, राजकारणी तसेच थोर व्यक्तींच्या नावाचा समावेश आहे. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा या दोघांच्याही नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. या दोन्ही संतांचे कार्य लक्षात घेता विद्यार्थ्यांपर्यंत त्यांची महती पोहोचण्याची आवश्यकता आहे. असे दिवस साजरे केल्याने विद्यार्थ्यांनी राष्ट्रपुरुषांची ओळख होते. मात्र यात या दोन्ही संतांचे नावच नसल्याने त्यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचतील तरी कसे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यासंदर्भात धनराज माने यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांचा मोबाईल ह्यस्वीच आॅफह्ण होता.कुलगुरूंनी व्यक्त केले आश्चर्ययासंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर या दोघांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. या दोन्ही संतांचे कार्य पाहता त्यांची जयंती सर्वच विद्यापीठांमध्ये साजरी होणे अभिप्रेत आहे. राज्यातील इतर विद्यापीठांना ज्या थोर पुरुषांची नावे आहेत, त्यांच्याबाबत यादीच्या माध्यमातून निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वच विद्यापीठांत राष्ट्रसंत तसेच गाडगेबाबा यांची जयंतीदेखील साजरी झाली पाहिजे. याबाबत राज्य शासनाला विनंती करणार असल्याचे डॉ.काणे यांनी सांगितले. संबंधित परिपत्रक राज्य शासनाचे असून निर्णय त्यांच्याच अखत्यारित येतो. मात्र तरीदेखील आम्ही शासनाला पत्र पाठवून भावना कळवून, असे डॉ.चांदेकर यांनी स्पष्ट केले.
तुकडोजी महाराज, गाडगेबाबांचा राज्य शासनाला विसर
By admin | Updated: January 15, 2017 22:41 IST