मुंबई : हाजी अली दर्ग्याबाहेर आंदोलन करण्यासाठी आलेल्या भुमात ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांना पोलिसांनी गुरुवारी आंदोलन करण्यासाठी विरोध केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी आपला मोर्चा वळवल्याने तृप्ती देसाई यांच्यासह त्यांच्या सात ते आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर जमावबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हाजी अली दर्ग्यात महिलांनाही मुक्त प्रवेश मिळावा अशी मागणी करत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी गुरुवारी हाजी अली दर्ग्यासमोर आंदोलन केले. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी आंदोलकांना दर्ग्यात प्रवेश करण्यापासून रोखल्याने देसाई आणि त्यांच्या समर्थकांना हाजी अलीच्या प्रवेशद्वारावरूनच परतावे लागले. देसाई यांनी दर्ग्यात महिलांना असलेल्या प्रवेश बंदीविरोधात आंदोलन करण्याची घोषणा केल्यानंतर गुरुवारी सकाळपासूनच परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. त्यातच एमआयएम, समाजवादी पार्टीसह मुस्लीम नेते आणि संघटनांनी दर्ग्यातील महिलांच्या प्रवेशावर जोरदार आक्षेप घेत दर्ग्यात दाखल झाल्याने वातावरण तापले होते. सायं. ५.३०च्या सुमारास देसाई यांनी समर्थकांसह दर्ग्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखून धरले. प्रवेशद्वारासमोरच ठाण मांडून त्यांनी निषेध व्यक्त केला. त्यांनी समर्थकांसह दर्गा प्रवेशाचा हट्ट धरला होता. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. अखेर दर्ग्याच्या बाहेरील फुटपाथावर उभे राहून देसाई यांनी दर्ग्याला नमस्कार केला. >या वेळी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. दर्ग्यातील प्रवेशाला मज्जाव केला जातो. ही कसली व्यवस्था, असा सवाल देसाई यांनी केला. हाजी अली येथील आंदोलनानंतर या अघोषित बंदीचा जाब विचारण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी धडकणार असल्याची घोषणा देसाई यांनी केली. >तत्पूर्वी मुस्लीम नेते, संघटना तसेच समाजवादी पार्टी, एमआयएमच्या स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी महिलांच्या दर्ग्यातील प्रवेशावर जोरदार आक्षेप घेतला. मंदिर प्रवेशाचा मुद्दा करत तृप्ती देसाई केवळ प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोणताही आदेश येऊ दे आम्ही ऐकणार नाही. तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना धक्के मारून बाहेर काढू, असा इशारा सपा नेते अबू आझमी यांनी दिला.>सध्या हाजी अली दर्ग्यात महिलांना विशिष्ट मर्यादेपर्यंतच जाण्याची परवानगी आहे. त्या ठिकाणापर्यंत जाण्यासही तृप्ती देसाई यांना अबू आझमी यांनी आता विरोध केला. सपा समर्थकांनी या वेळी तृप्ती देसाई यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. याशिवाय एमआयएमचे स्थानिक नेते, पदाधिकारी, काही मुस्लीम संघटनांनीही देसाई यांच्या विरोधात दुपारी निदर्शने केली.
तृप्ती देसार्इंचा दर्गा प्रवेश रोखला
By admin | Updated: April 29, 2016 05:56 IST