धारणी : तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरात बोगस डॉक्टरांना सुगीचे दिवस आले आहेत. एका दहा वर्षिय आदिवासी बालकाला येथील एका युनानी डॉक्टरने चुकीचे इंजेक्शन टोचल्याने या बालकाची प्रकृती गंभीर झाली आहे. या प्रकरणात उपजिल्हा रूग्णालयाची भूमिकादेखील संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. या घटनेसाठी जबाबदार युनानी डॉक्टरचे नाव शेख असे आहे. मनमोहन सूरजलाल जावरकर असे गंभीर अवस्थेतील मुलाचे नाव असून त्याला २२ सप्टेंबर रोजी उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तलई येथील इयत्ता चौथीत शिकणारा मनमोहन सूरजलाल जावरकर याला ताप आल्याने त्याला युनानी डॉक्टर शेखकडे आणण्यात आले. त्या डॉक्टरने त्याला इंजेक्शन दिले. त्यानंतर लगेच त्याच्या कमरेवर मोठी गाठ आली. पाहता-पाहता त्याचे शरीर सुजून गेले. यानंतर त्या डॉक्टरने आदिवासी मुलाला उपजिल्हा रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. २२ सप्टेंबर रोजी त्याला उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. सद्यस्थितीत त्याची प्रकृती गंंभीर असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
चुकीच्या इंजेक्शनमुळे आदिवासी मुलगा गंभीर
By admin | Updated: September 28, 2015 02:44 IST