विलास जळकोटकर
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. १४ - पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने सरकारी पातळीवर प्रयत्न होत असताना नागरिकांमधूनही सजगता दाखवत जाणीव जागृती निर्माण झाल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळू लागले आहे. सोलापुरात सध्या परराज्यातूनही अनेकविध फुलांसह बहरणाºया डेरेदार वृक्षांच्या रोपवाटिका दिसू लागल्या आहेत. जनतेमधूनही ही रोपे विकत घेऊन आपल्या परसदारी, बंगल्याभोवती लावण्यासाठी उत्स्फूर्तपणे गर्दी दिसू लागली आहे.
शहरातील पठाणबाग परिसरात अनेक रोपवाटिकांनी आंध्र, कर्नाटक, विशाखापट्टणमसह पुणे, उरळी कांचन, रत्नागिरी येथून विविध रंगी रोपे सोलापूरकरांसाठी उपलब्ध केली आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरातील विविध भागातून रोपांची खरेदी करण्यासाठी सहकुटुंब येणाºयांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
जनतेचा प्रतिसाद पाहून शहरातील विविध भागात कार्यरत असलेल्या नर्सरींमध्येही अनेकविध रोपांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. घराच्या भोवती सावली देणाºया वृक्षांसह फुलझाडांची रोपे खास परप्रांतातून मागवण्यात आल्याचे रमेश दुधनी आणि रहिमान मोमीन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. एकूणच शहरभर वृक्षारोपणाबद्दल जागरुकता दिसू लागली आहे.
फुलांच्या रोपांना विशेष मागणी
घराभोवती सुशोभीकरणासाठी प्रामुख्याने शोभीवंत आणि सुवास असणाºया फुलांना सोलापूरकरांकडून पसंती मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामध्ये १२ महिने फुले येणारे पेंटस, सालविया अलाबंडा, गौरीचौडी याचा समावेश आहे. याशिवाय शेवंती, जास्वंदी, बेला मोगरा, बट मोगरा, मोती मोगरा, जरबेरा, कटमिरी, गुलाब, डज गुलाब, वेलवेट, जिनिया, कासमास,पिठोनिया, फेलियस, मनी प्लाँट, साँग आॅफ इंडिया, महात्मा ड्रेसिना, सिंगापुरी ड्रेसिना, लेडी फिंगर फाम, सफिया ड्रेसिना, अरेलिया अशी ग्राहकांच्या पसंतीसाठी विविध जातीची रोपे शहरात आल्याने चोखंदळ ग्राहक या झाडांची उपयुक्तता, वैशिष्ट्ये जाणून घेऊन खरेदी करीत असल्याचे दिसून आले.
ग्राहकांच्या पसंतीला वाव
१०० हून अधिक प्रजातीच्या रोपांची मांडणी विविध नर्सरीमध्ये करण्यात आल्यामुळे ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार खरेदी करण्यास वाव मिळत आहे. जमिनीवर दहा ते १२ फूट आणि कुंडीत पाच फूट वाढणारे पोस्टेल फाम, अरेगा फाम, बुट्टा फाम या वृक्षांची रोपेही पाहायला मिळाली. दरवर्षीपेक्षा यंदा लोकांमध्ये वृक्षारोपणासंबंधी अधिक जागरुकता आढळून आल्याचे रहिमान मोमीन यांनी सांगितले.
होय वृक्षांशिवाय पर्याय नाही!
गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणाचा ढासळलेला समतोल संतुलित ठेवण्यासाठी वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही हे आम्हाला कळून चुकले आहे. बेसुमार वृक्षतोडींमुळेच ही स्थिती उद्भवली आहे. याला पर्यावरणप्रेमींकडून दुजोरा मिळाला आहे. यासाठी प्रत्येकाने एकतरी झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे या जाणिवेतूनच आम्ही आमच्या पसंतीनुसार रोपांची खरेदी करून त्याची जपणूक करणार आहोत अशा आशयाच्या प्रतिक्रिया रोपांच्या खरेदीसाठी आलेल्या कल्पना चौगुले, अस्मिता देशपांडे, सुहास परदेशी, संजय डोईफोडे यांच्यासह अमित देशपांडे, संजय सातपुते, अनिल जोशी, पवन गायकवाड या बच्चेकंपनींनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.