ऑनलाइन लोकमत -
घोटी (नाशिक), दि. 30 - घोटी सिन्नर रस्त्यावर घोटीजवळ असणाऱ्या सिन्नर फाट्यावर शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास रस्ते विकास महामंडळाने उभारलेली दिशादर्शक फलक पावसामुळे कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तासांहून अधिक काळ ठप्प झाली. दरम्यान या घटनेमुळे या मार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी वाहतुक सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खंबाळे येथील अधिकारी आव्हाड यांच्याशी सातत्याने संपर्क करूनही संबधित अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याने अखेर पोलिसांनी हि वाहतूक एकतर्फी चालू केली.
घोटी सिन्नर रस्त्यावर घोटीपासून शिर्डीकडे जाण्यासाठी तब्बल पाच वर्षांपूर्वी रस्ते विकास महामंडळाने घोटी सिन्नर शिर्डी रस्त्याची बांधा वापरा व हस्तांतरीत करा या तत्वानुसार निर्मिती करण्यात आली होती. या रस्त्यावर घोटी जवळ सिन्नर फाट्यावर लोखंडी दिशादर्शक फलक लावण्यात आले होते. हे फलक कालबाह्य झाल्याने गंजले होते. दरम्यान हे फलक गंजल्याची कल्पना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना महिनाभरापूर्वी देऊनही आज हि कमान पावसाच्या संततधारेमुळे कोसळली.यामुळे या मार्गावरील वाहतूक दोन तासांहून अधिक काळ ठप्प झाली. या मार्गावरील वाहतूक दुतर्फा ठप्प झाली व देवळे गावापर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या.
दरम्यान याबाबत घोटीचे पोलीस उपनिरीक्षक कमलेश बच्छाव यांच्यासह पोलीस कर्मचारी सोनवणे,कोकाटे,संदीप झाल्टे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आव्हाड यांच्याशी संपर्क साधून मदतीची मागणी केली. मात्र या बाबीकडे दुर्लक्ष झाल्याने तसेच या विविभागाच्या अधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्याने अखेर पोलिसांनी हि वाहतूक एका बाजूने चालू करीत वाहनचालकांना दिलासा दिला.