प्रशांत माने,
कल्याण- कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी दौलतजादा केली किंवा कार्यालयातच यथेच्छ दारुची पार्टी केली तरी प्रशासनाला त्याचे सोयरसुतक नाही. थातूरमातूर कारवाईचे नाटक करून तळीरामांना अभय देण्याचेच प्रशासनाचे धोरण असल्याचे यापूर्वीच्या घटनांवरून स्पष्ट झाल्याने कर्मचारी पुन:पुन्हा झिंग झिंग झिंगाट करायला धजावत आहेत.डोंबिवली विभागीय कार्यालयातील ‘ग’ प्रभागाच्या भांडारगृहात सोमवारी रात्री ओली पार्टी झोडण्यात आल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे संबंधित क र्मचारी हे ‘फेरीवाला हटाव’ पथकातील आहेत. फेरीवाल्यांचे अतिक्रमण हा चर्चेचा आणि प्रशासनावरील टीकेचा मुद्दा ठरत असताना या पथकातील कर्मचारी कार्यालयात दारू ढोसत असल्याचे कॅमेरात कैद झाल्याने महापालिकेची अब्रु वेशीला टांगली गेली आहे.कर्मचाऱ्यांच्या विलासी कृत्यांना राजकीय अभय आणि प्रशासनाचा कृपाशीर्वाद मिळत असल्यानेच वरचेवर हे प्रकार होत असल्याचे काही अधिकाऱ्यांचे मत आहे.यापूर्वी २६ जानेवारी २०१५ ला केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात माघी गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दारूच्या नशेत बीभत्स नाच करीत लावणी सादर करणाऱ्या नर्तिकेवर पैसे उधळल्याची घटना घडली होती. कर्मचाऱ्यांचे हे प्रताप मोबाईलमध्ये कैद होऊन व्हॉटसअॅपच्या माध्यमातून सर्वदूर पसरले होते. दौलतजादा करणाऱ्या तब्बल १४ कर्मचाऱ्यांना तत्कालीन आयुक्त मधुकर अर्दड यांनी निलंबित केले होते. या घटनेला दीड वर्षांचा कालावधी उलटत नाही तोच जुलै २०१६ मध्ये गटारी अमावस्येच्या दिवशी महापालिकेच्या ‘ड’ प्रभागक्षेत्र कार्यालयासमोरील पाण्याची टाकी परिसरातील आतमधल्या खोलीमध्ये पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी आॅनड्युटी मद्यपान करीत होते. हा प्रकारही सोशल मीडियावर छायाचित्रांसह प्रसारीत होताच आयुक्त ई. रवींद्रन यांनी संबंधित ७ कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. दौलतजादा असो अथवा गटारी प्रकरण असो आजमितीला हे सर्व कर्मचारी पालिका सेवेत कार्यरत आहेत.दौलतजादा प्रकरणात काही महिने कर्मचारी निलंबित होते. मात्र वाढत्या राजकीय दबावापुढे संबंधित कर्मचाऱ्यांना सेवेत रूजू करून घेणे प्रशासनाला भाग पडले होते. जुलै महिन्यात गटारीच्या दिवशी घडलेल्या प्रकरणात निलंबित कर्मचाऱ्यांना काही अवधीतच पालिका सेवेत रूजू करून घेण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे या कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा पाणीपुरवठा विभागातच वर्णी लावण्यात आली. (प्रतिनिधी)>ताज्या प्रकरणातही चौकशी होऊन अहवाल मागविले जातील आणि कारवाईचा फार्स केला जाईल. परंतु नेहमीप्रमाणे राजकीय दबावापोटी थातूरमाथूर कारवाई होईल. परिणामी कर्मचाऱ्यांवर कोणाचाही धाक नाही. गुरूवारच्या महासभेत या प्रकरणाचे पडसाद उमटतील, अशी अपेक्षा आहे. परंतु मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असेच चित्र कायम आहे.