नागपूर : चोर लुटारूंनी शहरातील व्यापाऱ्यांना सोमवारी रात्री टार्गेट केले. ७ ते ९ अशा अवघ्या दोन तासांच्या कालावधीत चोरट्यांनी एका व्यापाऱ्याची कारमधून बॅग लंपास केली. दुसऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतील रक्कम चोरून नेली. तर, तिसऱ्याला चाकूचा धाक दाखवून लुटले. गणेशपेठ, कोतवाली आणि प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. गणेशपेठकारमधील रोकड लंपासनंबर प्लेटवर रक्त पडल्याचे सांगून संजय कांतीलाल गौतम (वय ४४) यांच्या कारमधील बॅग चोरट्यांनी लंपास केली. या बॅगमध्ये ६० हजारांची रोकड होती. गौतम हे आदित्य एकविरा अपार्टमेंटमध्ये राहातात. त्यांचे इलेक्ट्रिकल्सचे दुकान आहे. सोमवारी रात्री ७.१५ च्या सुमारास गौतम आपल्या आल्टो कारने घराकडे निघाले. अग्रसेन चौकात एका मुलाने गौतम यांना ‘तुमच्या गाडीच्या नंबरप्लेटवर रक्त पडले आहे‘, असे सांगितले. त्यांनी तेथे न थांबता गणेशपेठेतील मारवाडी चाळीजवळ कार थांबवली. कारमधून उतरल्यानंतर मुलांना बोलविण्यासाठी ते गोदामाकडे गेले. तेवढ्या वेळेत चोरट्यांनी त्यांच्या कारमधील ६० हजारांची रोकड असलेली बॅग चोरून नेली. गौतम यांच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोतवालीअॅक्टिव्हातून रक्कम लंपासबालकिसन रूपचंद बियाणी (वय ४४, रा. व्यंकटेश अपार्टमेंट, तुळशीबाग) यांचे भगवती बूक डेपो आहे. सोमवारी रात्री ८ च्या सुमारास दुकानातील ७० हजारांची रोकड घेऊन ते निघाले. दुकानाला कुलूप लावले नसल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी अॅक्टिव्हा दुकानासमोर उभी केली आणि कुलूप लावायला गेले. तेवढ्या वेळेत चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतील ७० हजारांची रोकड चोरून नेली. ही बाब लक्षात आल्यानंतर बियाणी यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रतापनगरअॅक्टिव्हा अन् रक्कम हिसकावलीअनुप जयप्रकाश पनपानिया (वय ४२) सोमवारी रात्री ९ च्या सुमारास दुकान बंद करून सुभाषनगरातील आपल्या घराकडे जात होते. वडनेरे ज्वेलर्ससमोर दुचाकीवर आलेल्या तीन लुटारूंनी त्यांना अडविले. चाकूचा धाक दाखवून शिवीगाळ करीत दुचाकीच्या खाली उतरविले. पनपानिया यांची दुचाकी हिसकावून आरोपी पळून गेले. या दुचाकीच्या डिक्कीत ८५ हजार रुपये होते. पनपानिया यांचा दुकानापासूनच आरोपी पाठलाग करीत असावे, असा संशय आहे. पनपानिया यांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)
व्यापारी लक्ष्य
By admin | Updated: December 17, 2014 00:36 IST